व्हॉटसअॅपमुळे दहावीतील प्रेमाचे ‘रियुनियन’, दोघांनी मिळून काढला बायकोचा काटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तब्बल दहा वर्षांपूर्वी वेगळे झालेले एक युगुल शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे जवळ आले. काळाच्या ओघात दूर झालेल्या युगलांमध्ये बघता बघता प्रेम पुन्हा बहरले. पण या प्रेमात पत्नी अडथळा ठरत असल्याने वैतागलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राम येथे घडली आहे.

राहुल मिश्रा असे या प्रियकराचे नाव असून पद्मा तिवारी असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. राहुल आणि पद्मा केजीपासून एकाच वर्गात होते. पण त्यांच्यात प्रेम जुळले ते दहावीत. मात्र शिक्षण आणि नोकरीनिमित्त हे दोघे दोन टोकांना निघून गेले आणि दहावीतल हे प्रेम हवेतच विरलं. राहुल एमबीए करण्यासाठी धनबाद सोडून ग्वाल्हेरला निघून गेला. तर पद्माला 2012 मध्ये दिल्लीत नोकरी मिळाली. पण 2015 मध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ते पुन्हा एकमेकांना भेटले आणि त्यांच प्रेम नव्याने सुरू झाले. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. याबद्दल राहुलची पत्नी पूजा हिला कळताच तिने राहुलला याबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावरून त्यांच्यात वरचेवर खटके उडू लागले.

अखेर राहुल आणि पद्मा यांनी पूजाचा काटा काढायचा निर्णय घेतला. 16 मार्चला ठरल्याप्रमाणे पद्मा पूजाच्या घरी गेली व तिने तिला विष पाजले. त्यानंतर पूजाच्या नावाने तिनेच आत्महत्येची चिठ्ठी लिहून ठेवली. जेणेकरून पोलिसांना हे आत्महत्येचे प्रकरण वाटेल.

मात्र २७ एप्रिल रोजी पूजाचा पोस्टमार्टम अहवाल आला. त्यात पूजाच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचे नमूद करण्यात आले होते. हे बघताच पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. त्यांनी राहुल व पद्मा यांना पोलिसी खाक्या दाखवताच पद्माने पूजाला विष देऊन तिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर राहुलचाही यात समावेश असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.