कार्यकारी अभियंत्यांनी केली खेड तालुक्यातील धरणांची पाहणी

37

सामना प्रतिनिधी, खेड

तालुक्यातील कोंडिवली धरणाला गळती लागली असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची दाखल घेत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी कोंडिवली धरणाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्थ असल्याचे स्पष्ट झाले असल्याने या धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

खेड तालुक्यातील कोंडिवली धरणाची उभारणी 1996 साली करण्यात आली. या धरणाची पाणी साठवण क्षमता 4.68 द.ल.घ मी इतकी आहे. मात्र धरणाच्या कालव्यांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने या धरणातील पाण्याचा एक थेंबही शेतीसाठी वापरण्यात येत नाही. धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात महाकाय मगरींचा वावर आहे त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या धरणाचा उपयोग मगरीच्या वास्तव्यासाठी सोडला तर कश्यासाठीच होत नाही.

काही वर्षांपूर्वी धरणातील अतिरिक्त पाणी साठ्यामुळे धारण फुटण्याची श्यक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्याची भीती तोडून पाण्याला वाट करून देण्यात आली होती. त्यानंतर खरतर कालव्यांची कामे करायला हवी होती. ती केली गेली असती तर धरणाखालील कोंडिवली गावासह निलिक, अलसुरे,भोस्ते या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा झाला असता मात्र गेल्या कित्येक वर्ष्यात धरणाच्या दुरुस्तीकडे किंवा कालव्यांच्या कामांकडे लक्षच न दिले गेल्याने उशाला असलेले धरण कोंडिवली गावच्या ग्रामस्थांसाठी मृत्यूची टांगती तलवार आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील धरणांचा प्रश्न ऐरिणीवर आला आहे. ज्या धरणांना थोडीफार गळती लागली आहे तेथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कोंडिवली धरणाला लागलेली गळतीबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत खेड तालुक्यातील सर्व धरणांची पाहणी करण्याचे आदेश संबधीत विभागाला देण्यात आले होते. या नुसार रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी गुरुवारी खेड तालुक्यातील कोंडिवली, शिरवली, आणि नातूनगर या तीन धरणांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या सोबत नातूवाडी धरण प्रकल्याचे अधीकारी गोविंद श्रीमंगले हे देखील होते. या पाहणीदरम्यान कोंडिवली धरणाबाबत ग्रामस्थांनी केलेले गळतीच्या तक्रातील काही प्रमाणात तथ्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीसाठी लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिरवली आणि नातूवाडी ही दोन्ही धरणे सुस्थितीत असल्याचा निर्वाळाही पाटील यांनी यावेळी दिला.

जगदीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आठ धरणांना काही प्रमाणात गळती लागली असून या मध्ये निवे, कोंडीवली, मोरवणे, तेलेवाडी, खेम, साखरपा, तळवडे, टांगर या धरणांचा समावेश आहे. या आठही धरणांची नाशिक येथील धरण सुरक्षितता विभागाकडून पुन्हा तपासणी केली जाणार असून या धरणांच्या ठिकाणी दोन कर्मचारी कायमस्वरूपी पाहणी करण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या