रांगडा खेळ

बाळ तोरसकर, baltoraskar@gmail.com

खेळ व व्यायाम यांचा संबंध अनन्यसाधारण आहे. पावसाळ्यात काही मैदानी खेळ आपल्याला खेळता येत नाहीत. त्यावेळी आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवणे हा खेळासाठीचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी शहरातल्या किंवा गावात कुठल्याही गल्लीत सकाळी अथवा संध्याकाळी मुलांचा ग्रुप जमून पारंपरिक खेळ खेळले जात असत. हा ग्रुप विरुध्द तो ग्रुप, ही गल्ली विरुध्द ती गल्ली, खेळ होत असत. मग त्यात कोणतेही खेळ असतील जसे आपण पावसाळ्यात दोरी उडय़ा, उंच उडय़ा, बेडुक उडय़ा, छोटय़ा शर्यती, लंगडी व मुख्य म्हणजे फुटबॉल इत्यादी खेळ खेळून आपल्या मुख्य खेळाच्या प्रवाहात तंदुरुस्त राहू शकतो हे आपण मागील काही लेखात पाहिले आहे. ग्रामीण भागामध्ये विटी-दांडू, आटय़ापाटय़ा, लंगडी, लगोरी आणि इतर खेळ सर्रास खेळले जायचे. या वरील खेळाव्यतिरिक्त आपण दुसरं काय करू शकतो हेसुध्दा आपण या लेखात पाहू जेणेकरून आपले मन व शरीर दोन्ही आनंदी व तंदुरुस्त राहू शकतात.

या खेळांमध्ये रस्सीखेच, लगोरी, भोवरा, गिर्यारोहण आदी खेळ खेळून आपण आपले मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त ठेवून आनंदी राहू शकतो. पावसाळ्यात फुटबॉल खेळताना चेंडू व खेळाडू चिखलात माखतात ते पाहता खेळाडूंच्या चेहऱयावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतो जस फुटबॉलच तसच गिर्यारोहणच, यातसुध्दा खेळाडू पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात गिर्यारोहणाचा आनंद घेताना निसर्गाचा व गिर्यारोहणाचा आनंद घेत आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो.

असंच रस्सीखेच या खेळाचंसुध्दा आहे. जर रस्सीखेच हा खेळ इतर ऋतूत खेळला तर त्याचा एक वेगळा आनंद असतो तर पावसाळ्यात वेगळा आनंद असतो. पावसाळ्यात मैदानातील मातीत रस्सीखेचसारखा खेळ खेळला तर त्या चिखल मातीत मिळणारा आनंद जीवन बहरून टाकतो. चिखल मातीत केलेली रस्सीखेच व त्यामुळे उडणारी तारांबळ, होणारी घसरा-घासरी व वापरली जाणारी ताकत हे आपल शरीर दणकट, पिळदार तर होतेच त्याचबरोबर शरीराला लवचीकता व ताठरपणासुध्दा प्राप्त होतो. त्यामुळे नियमापलीकडे जाऊन एक रांगडा खेळ आपण खेळून आपल्या शरीराची व्यायामाची भूक भागवू शकतो. मात्र हे करत असताना आपल्याला कोणतीही शारीरिक इजा होणार नाही याची मात्र काळजी खेळाडूलाच घ्यावी लागते.

पावसाळ्यात लगोरी खेळ मातीत खेळला तर मात्र खेळाडूंचा कसच लागेल. एकदा का लगोरी पाडली की ती पुन्हा उभारताना व प्रतिस्पर्धी खेळाडूकडून चेंडूने बाद करण्याचा प्रयत्न व तो चुकवण्यासाठी करावी लागणारी कसरत मात्र खेळाडूला एक वेगळा आनंद मिळवून देत असतो. पावसाळ्यातील चिखल मातीत मात्र पुन्हा एक वेगळी कसरत व वेगळा आनंद घेताना आपण आपले शरीर लवचीक तर होतेच त्याचबरोबर चिखल मातीत स्लायडिंग करतानाचा आनंद वेगळाच असतो. त्यावेळी होणारी पळापळ व होणारी कसरत मात्र या नैसर्गिक आनंदात भरच घालतात. मात्र हे करत असताना कोणतीही शारीरिक इजा होणार नाही याची मात्र काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.

भोवऱयासारखा खेळही पावसात एक वेगळा आनंद मिळवून देत असतो. या खेळासाठी टणक भाग उपलब्ध असेल तर मात्र या खेळातला आनंद एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. घराच्या, इमारतीच्या अंगणात चाळीतील सामायिक असलेल्या टणक जागेत भोवऱयाची मजा मात्र आपल्याला एक वेगळीच नशा मिळवून देईल यात शंकाच नाही. असे वेगवेगळे खेळ या पावसाळी वातावरणात खेळून आपण आपला आनंद द्विगुणित तर केला पाहिजेच पण त्याचबरोबर आपल्या तंदुरुस्तीसाठीसुध्दा हे खेळ उपयोगी पडतात.