मुंबई-पुणे डेक्कन एक्प्रेसचे महागडे नळ चोरीला, 169 टॉयलेट फिटिंगचे साहित्य लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या आलिशान ‘तेजस’ एक्स्प्रेसमधील हेडफोन चोरीला गेल्याची घटना विस्मरणात गेली नसतानाच आता मध्य रेल्वेने प्रवाशांना आरामदायी सोयी-सुविधा देण्यासाठी प्रोजेक्ट ‘उत्कृष्ट’अंतर्गत अपग्रेडेड केलेल्या मुंबई ते पुणे डेक्कन एक्स्प्रेस व गदग एक्स्प्रेसमधील महागडे नळ व बाथरूम फिटिंग चोरीला गेले आहेत.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या प्रयत्नाला काही प्रवाशांच्या उपद्व्यापामुळे गालबोट लागले आहे. मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाच्या ‘उत्कृष्ट’ योजनेतून लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे रूपडे बदलण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पात प्रथम मुंबई ते पुणे धावणार्‍या डेक्कन एक्स्प्रेस आणि गदग एक्स्प्रेसचे रूपडे प्रत्येकी 60 लाख रुपये खर्च करण्यात येऊन बदलण्यात आले होते. अशा प्रकारे मध्य रेल्वेच्या 24 गाड्यांना अपग्रेड करण्यात येणार आहे. यात डब्यांना वेगळा रंग देण्याबरोबरच प्रसाधनगृहात अधिक स्वच्छता राखण्यासाठी काही बदल केले होते. त्यात प्रवाशांच्या मागण्यांवरून लाद्या, टॉयलेटचे भांडे, आधुनिक फ्लश यंत्रणा आणि नळ बसविले होते.

या दोन गाड्यांमधील टॉयलेट फिटिंगच्या साहित्याची मोडतोड अज्ञात प्रवाशांकडून होऊन मार्च 2019 पासून आतापर्यंत एकूण 169 टॉयलेट फिटिंगचे साहित्य, महागडे नळ चोरीला गेले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी जग्वार, हिंदवेअर आणि सेरासारख्या कंपन्यांचे महागडे नळ बसविण्यात आले होते, मात्र अज्ञातांकडून ते चोरीला गेले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यार्ड आणि वर्कशॉपमध्ये सुरक्षा तगडी असते, परंतु जेव्हा ट्रेनचा प्रवास ज्या स्थानकावर संपतो तेथे ट्रेन पोहचल्यानंतर चोरी झाल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

एका नळाची किंमत 1500 रुपये

डेक्कन एक्स्प्रेसमधील 240 फिटिंगपैकी 99 फिटिंग चोरीला गेले तर गदग एक्स्प्रेसमधील 160 फिटिंगपैकी 70 चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. हे साहित्य महाग असल्याने लगेच त्यांचे रिप्लेसमेंट करणे कठीण असते. हे नळ चोरणार्‍यांनी निष्कारण टॉयलेटची भांडीदेखील फोडली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. एका नळाची किंमत 1500 रु., फ्लशर वॉल्व्हची 2,800 तर स्प्रे पंपाची किंमत 1400 रुपये आहे.

डेक्कन एक्स्प्रेसमधील चोरी

फ्लशर वॉल्व्ह – 60 पैकी 20

पाण्याचे नळ    – 120 पैकी 51

हॅण्ड पंप     – 60 पैकी 28

गदग एक्स्प्रेसमधील चोरी

फ्लशर वॉल्व्ह – 40 पैकी 27

पाण्याचे नळ    – 80 पैकी 27

हॅण्ड पंप     – 40 पैकी 16