रुग्णांना एक्सपायरी डेट ओलांडलेल्या औषधांचे वाटप, प्रभादेवी पालिका दवाखान्यामधील धक्कादायक प्रकार; शिवसेनेने विचारला जाब

रुग्णांना एक्सपायरी डेट ओलांडलेल्या औषधांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार प्रभादेवी येथील महापालिकेच्या दवाखान्यात घडला आहे. या प्रकरणी शिवसेनेने जाब विचारल्यानंतर मुदत संपलेली औषधे रुग्णांना देण्यात येणार नाहीत, असे आश्वासन दवाखान्याच्या वतीने देण्यात आले आहे.

जी-दक्षिण विभागातील ओल्ड प्रभादेवी रोडवर असलेल्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात मुदत संपलेल्या औषधांचे वितरण रुग्णांना होत असल्याची तक्रार विभागातील नागरिकांनी शिवसेनेच्या शाखेत केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई आणि विभागप्रमुख-आमदार महेश सावंत यांच्या सूचनेनुसार शाखाप्रमुख संजय भगत यांनी शिवसैनिकांसह या दवाखान्याला भेट दिली. त्या वेळी दवाखान्यात मुदतबाह्य औषधांचा साठा आढळला. शिवसैनिकांनी तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांना घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला असता पुन्हा अशी मुदत संपलेली औषधे नागरिकांना देण्यात येणार नाहीत, असे आश्वासन दवाखान्याच्या वतीने देण्यात आले.

या वेळी विधानसभा उपसंघटक सूर्यकांत बिर्जे, लक्ष्मण भोसले, माजी नगरसेविका ज्योती भोसले, शाखा समन्वयक वैष्णवी फोडकर, उल्हास कदम, तन्मय विलनकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.