दहावीची परीक्षा देणाऱ्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सातवी, नववीनंतर ‘कौशल्य सेतू’ मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया तसेच यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. कौशल्य सेतू अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पात्र विद्यार्थ्यांना दहावीच्या एक किंवा दोन विषयांसाठी वाढीव गुणांची सवलत मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ चा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दहावीतील दोन भाषा व श्रेणी विषय वगळून इतर विषयांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटचा लाभ घेता येणार आहे. कोणत्या विषयांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटचा लाभ घ्यायचा आहे याची माहिती विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये द्यायची आहे. एकदा अर्ज सादर केल्यानंतर सदर विषयांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट दिल्यानंतरही विद्यार्थी नापास झाल्यास तो विद्यार्थी उर्वरित विषयांसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षेला बसू शकतो. तसेच परीक्षा उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजना किंवा नियमित विद्यार्थी म्हणून पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही. 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

असा घ्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिटचा लाभ
www.mahahsscboard. maharashtra.gov.in या वेबसाइटवरील नोंदणी अर्ज भरावा. पूर्ण भरलेला अर्ज 22 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत मुख्याध्यापकांच्या सही-शिक्क्यासह विभागीय शिक्षण मंडळात भरावा.अर्जासोबत दहावी परीक्षेचे गुणपत्रक आणि कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत 40 रुपये प्रक्रिया शुल्क आणि गुणपत्रिका शुल्क 10 असे एकूण 50 रुपये भरावे.