गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज…210 जादा फेऱ्या

306

गणपतीचा सण अगदी तोंडावर आला असताना कोकण रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी केली आहे. यंदा कोकण रेल्वे नियमित गाडय़ांव्यतिरिक्त मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने तब्बल 210 जादा गाडय़ा कोकणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा 647हून जादा डब्यांची वाढ करण्यात आली आहे. जादा गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेने बंदोबस्तात वाढ केली असून 204 आरपीएफ आणि होमगार्डच्या जवानांचा फौजफाटा कोकण मार्गावर जुंपण्यात आला आहे.

कोकणात गणपतीसाठी जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा कोकण रेल्वेने 210 जादा फेऱया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ट्रेन क्र.12051/52 दादर-मडगाव जनशताब्दीला यंदा 30 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी रोडला थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने दर वर्षाला सात लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. तिकिटांच्या आरक्षणासाठी बुकिंग काऊंटरवर होणारी गर्दी कमी होण्यासाठी विविध स्थानकांवर गरजेनुसार अतिरिक्त बुकिंग खिडक्या उघडण्यात येणार आहेत.

खेड, कणकवली आणि कुडाळ स्थानकांवर प्रथमोपचार केंद्र सज्ज ठेवण्यात आले असून चिपळूण, रत्नागिरी, थिविम, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडिपी येथे 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान आरोग्य केंद्रे उघडण्यात आली आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त स्टाफला सज्ज ठेवण्यात आले आहे. चेंगराचेंगरीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य पोलिसांशी समन्वय ठेवण्यात येत असून आरपीएफ स्टापला हेल्पलाईन 182वरून तसेच सोशल मीडिया ट्विटरवरून आलेल्या तक्रारींचाही छडा लावण्यासाठी सावध करण्यात आले असल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे.

तुतारी व मडगाव एसी डबलडेकरला जादा डबे
गणेशोत्सवासाठी होणारी गर्दी पाहता ट्रेन क्र. 11003/11004 दादर-सावंतवाडी रोड ‘तुतारी एक्स्प्रेस’चे डबे 15वरून 19 आणि ट्रेन क्र.11085/11086 आणि ट्रेन क्र. 11099/11100 मडगाव एसी डबलडेकरचे डबे 11वरून 18 करण्यात आले आहेत. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱया चाकरमान्यांची गर्दीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे.

गैरसोयीच्या गाडय़ा व ज्येष्ठांना सवलत नाही
मध्य रेल्वेने आणखीन सोडलेल्या सहा गणपती विशेष गाडय़ांपैकी दोन गाडय़ा तर एकदम गैरसोयीच्या आहेत. ट्रेन क्र. 01221 पुणे-सावंतवाडी ही गाडी रात्री 1.52 वा. कणकवलीत पोहचते व दुसरी ट्रेन क्र. 01223 एलटीटी-सावंतवाडी ही गाडी पहाटे 3.40 वा. कणकवलीला पोहचते. अशा रात्री-अपरात्री कोकणात पोचणाऱया गाडय़ांचा चाकरमान्यांना काय उपयोग? त्यात ज्येष्ठ नागरिकांना या विशेष गाडय़ांमध्ये तिकीट भाडय़ात सवलत मिळत नसल्याकडे ज्येष्ठ नागरिक बळीराम राणे यांनी लक्ष वेधले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या