डोळ्याची पापणी फडकणे आणि अशुभ घटना यांचा संबंध आहे ?

डोळ्याची पापणी फडकली की काहीतरी वाईट घडणार अशी एक अंधश्रद्धा रुढ झालेली आहे. पापणी का फडकते ? याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून करण्यात आलेला खुलासा बहुसंख्य लोकांना माहिती नाहीये. वास्तविक पाहता पापणी फडकण्याचा अशुभ घटनांशी संबंध नसून त्याचा तुमच्या आरोग्याशी संबंध आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवांमधील मांसपेशी फडकणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. डोळ्यांमधील मांसपेशी या त्याला अपवाद नाहीये.

शरीरातील मांसपेशी या विशेष तंतूंनी बनलेल्या असतात ज्यांना शरीरातील तंत्रिकांनी संचालित केल्या जातात. या तंत्रिकांना काही इजा झाली किंवा काही कारणांमुळे त्या नीट काम करू शकत नसतील तर मग पापणी फडकायला सुरुवात होते. सर्वसाधाराणपणे याबाबत चिंतेची काहीच बाब नसते, मात्र हे वारंवार होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरू शकतं. मांसपेशी आखडल्यासही पापणी फडकायला लागते. काही कारणामुळे मांसपेशी खेचल्या गेल्या असल्यास खालची किंवा वरची पापणी दोन्ही फडकू शकतात. जवळपास सगळ्यांनीच त्यांच्या आयुष्यात पापणी फडकण्याचा हा अनुभव घेतला असेल, मात्र काही जणांची पापणी इतक्या डोरात फडकते की त्यांना थोडावेळाने दिसणं बंद होतं, याला ब्लास्फेरोस्पाज्म म्हणतात.

yoga-for-eyes

पापणी फडकण्याचं प्रमाण काहींमध्ये थोडावेळासाठी असतं, काहींमध्ये दिवसभर असू शकतं तर दुर्मिळ प्रकरणांमध्ये काही महिनेही असू शकतं. काही दिवस सलग पापणी फडकत राहिली तर ती तुमच्या शरीरात काहीतरी गडबड आहे याचे संकेत देते. डोळे खाजणे, डोळ्यावर ताण येणे, झोप पूर्ण न होणे, तणाव, औषधाचे दुष्परीणाम यामुळे पापणी फडकण्याची शक्यता असते. डोळे शुष्क झाल्यास, पापण्या सुजल्यास किंवा डोळे आलेले असल्यास पापणी फडकताना त्रास होतो. सतत पापणी फडकत राहिल्यास तुमची दृष्टी अधू होण्याची शक्यता असते.

eyes

सतत पापणी फडकण्याचा मेंदू किंवा मज्जातंतूच्या आजाराशी संबंध असू शकतो असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र पापणी फडकण्यासोबत त्याची इतरही काही लक्षणे आहेत जी एकत्र दिसल्यास वरील व्याधींचा मुकाबला करावा लागू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पापणी फडकताना डोळा सुजल्यास, त्यातून पाणी यायला लागल्यास, डोळा बंद झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. पापणी फडकत असताना डोळा बंद झाल्यास त्याचा परीणाम तुमच्या चेहऱ्यावरही होऊ शकतो. पापणी वारंवार फडकत असेल तर डोळा गरम कापडाने शेकणे, ताणमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे असा सल्ला डॉक्टर देत असतात.

आपली प्रतिक्रिया द्या