पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये लागणार चेहरे ओळखणारे कॅमेरे

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये तसेच स्थानकांवर चेहरे ओळखून नियंत्रण कक्षात अलार्म वाजविणारी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वेची उपकंपनी ‘रेलटेल’ने घेतला आहे. हे कॅमेरे गर्दीतील चेहऱ्याचा पाठलाग करतील, रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला फुटेज पाठवतील अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. व्हीडीओ ऍनालिटिक्स तसेच फेस रिकगनेशन तंत्रज्ञानावर आधारित हे इंटरनेट प्रोटोकॉलवाले कॅमेरे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात येणार असून त्यासाठी ‘निर्भया फंडा’तून तरतूद करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या 10 रेल्वे स्थानकांवर ‘रेलटेल’ कंपनीद्वारा ऍडव्हान्स व्हिडीओ सर्व्हेलंस सिस्टमवर आधारित आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) ऍड्रेस यंत्रणा बसविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 200 स्थानकांवर रेलटेल हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा चोख ठेवण्यासाठी या स्थानकांवर बसविलेल्या सर्व कॅमेऱ्यांना ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार असून त्यांचे व्हिडीओ फुटेज नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आरपीएफला त्याच्या कक्षात बसून लाइव्ह फुटेजचे निरीक्षण करता येणार आहे. सध्या देशातील 81 स्थानकांवर हे काम पूर्ण झाल्याचे रेलटेलचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी स्पष्ट केले.

30 दिवसांपर्यंत फुटेज सुरक्षित राहणार

लाईव्ह फुटेज पाहता येणारे कॅमेरे आतापर्यंत केवळ मेट्रोमध्ये बसविलेले आहेत. आता लोकलच्या डब्यांतही असे कॅमेरे लागणार आहेत. व्हिडीओ ऍनालिटिक्स कॅमेरे संगणकात फिड केलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता बाळगणारे आहेत. त्यांना गर्दीत एखादा चेहरा शोधण्याचे कामदेखील करता येऊ शकणार आहेत. ते नियंत्रण कक्षाला अलार्म वाजवून ती व्यक्ती कुठे आहे ते कळवू शकतात अशी त्याची क्षमता आहे. रेल्वे स्थानकांवर बसविलेला एचडी कॅमेरे दिवसाला 1 टीबी डाटा तसेच 4 के कॅमेरा दिवसाला 4 टीबी डाटा दर महिन्याला संपवू शकतो. त्यांचे रेकॉर्डिंग 30 दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकते. घटनेनंतरचा तपास, गुन्हे तपासासाठी हे रेकॉर्डीग उपयोगी येणार आहे. तसेच महत्त्वाचे व्हिडीओ अनेक काळापर्यंत साठवून ठेवण्याची त्यांची क्षमता असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रिमियम गाडय़ांनाही लाईव्ह फुटेज कॅमेरे

फुल एचडी कॅमेरा डोम टाईप (इनडोअर एरिया), बुलेट टाईप (प्लॅटफॉर्मसाठी), पॅन ऍण्ड टील्ट झूम टाईप कॅमेरे (पार्किग एरिया), अल्ट्रा एचडी 4 के कॅमेरे (संवेदनशील जागांसाठी) अशा प्रकारचे कॅमेरे असणार आहेत. ए-1, ए, बी, सी, डी आणि ई दर्जाच्या स्थानकांवर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रिमियम गाडय़ांचे कोचेस तसेच उपनगरीय लोकलमध्ये हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सध्या भावनगर टर्मिनस, उधणा, बलसाड, वेरावल, नागदा, नवसारी, वापी, वीरमगाम, राजकोट और गांधीधाम या दहा स्थानकांवर ऍडव्हान्स सर्विलान्स सिस्टीम बसविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या