
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची गणना जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. झुकेरबर्ग यांनी सोशल मीडियावरील करोडो फॉलोअर्सला नुकताच एक प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांच्या वडिलांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. मुलाची काळजी करणारं पित्याचं हृदय बघून नेटीजन्सही भावुक झाले आहेत.
मार्क झुकेरबर्ग यांनी फॉलोअर्सला विचारलं होतं की, तुम्ही कोणत्यातरी कामात इतके ‘एक्सायटेड’ होता आणि अगदी खाणंपिणं विसरून जाता, असं कधी तुमच्याबाबतीत होतं का? होय माझ्याबाबतीत असं होतं. त्यामुळे मी गेल्या महिन्यात 10 पाऊंड वजन कमी केलं. मात्र आमचे नवीन प्रॉडक्ट्स खूप सुंदर असतील.
मार्क झुकेरबर्ग यांच्या प्रश्नाला हजारो लोकांनी उत्तरं आणि प्रतिक्रिया दिली. त्यापैकी एक प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांची म्हणजेच एडवर्ड झुकेरबर्ग यांची होती. ती सर्वांच्या हृदयाला स्पर्शून गेली. ‘तुला जेवणाची डिलिव्हरी करायला माझी किंवा तुझ्या आईची गरज आहे का,’ असं एडवर्ड यांनी मार्क यांना विचारलं. लेकाच्या काळजीपोटी विचारलेला हा प्रश्न अनेकांच्या हृदयाला भिडला आहे. तुम्ही कितीही अब्जाधीश असला तरी तुमचे पालक तुमची काळजी करणं सोडत नाहीत, हेच एडवर्ड झुकेरबर्ग यांच्या पोस्टमधून दिसून आलेय. नेटीजन्सनी त्यांच्या पोस्टला भरपूर लाईक्स दिल्या आहेत.



























































