विधान भवनातही आता फेशिअल रेकग्निशन सिस्टम, अधिवेशनातल्या राड्यानंतर प्रवेशावर निर्बंध; अनावश्यक गर्दी कमी करण्यावर आता भर

मंत्रालयानंतर आता विधान भवनातही आता ‘फेशिअल रेकग्निशन सिस्टम’ बसवण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या समर्थकांच्या दोन गटांत झालेल्या राड्यानंतर विधान भवनातील व्हिजिटर्सची अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या सिस्टीमची सुरुवात नागपूरपासून होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी ‘फेशिअल रेकग्निशन सिस्टीम’ लावण्यात आली आहे. सुमारे साडेदहा हजार अधिक अधिकारी व कर्मचाऱयांचा डेटा यामध्ये समाविष्ट केला आहे. तर व्हिजिटर्सना मंत्रालयात प्रवेशासाठी ‘आरएफआयडी’ कार्ड दिले जाते. आता हीच सिस्टम विधान भवनातही सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कारण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये लॉबीत जोरदार राडा झाला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या राड्याची गंभीर दखल घेतली आणि विधान भवनातील प्रवेशावर निर्बंध आणण्याचे सूतोवाच केले होते.

विधान भवनात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष अधिकारी समितीच्या सदस्यांची बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त व विधान भवनाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारीही उपस्थित होते. मंत्रालयाप्रमाणे विधान भवनातही ‘फेशिअल रेकग्निशन सिस्टम’ लावता येते का याची चाचपणी करण्याचे आदेश यावेळी दिल्याचे समजते.

विधान भवनात प्रवेशासाठी फेशिअल रेकग्निशन सिस्टीम सुरू करण्याची योजना विचाराधीन आहे. 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशानापासून ही सिस्टीम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. – ऍड. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष