
सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक अकाउंट बनवून दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकित डॉक्टरसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्याकडून दोन कोटी रोख रक्कम, मौल्यवान दागिने उकळले. हा ऐवज दिल्यानंतर तरुणीचे अकाउंट बंद झाले. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं.
या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी त्वरित उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ व सायबर सेल यांना घटनेची शहानिशा करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने सायबर सेल यवतमाळ, यांनी तक्रारदार यांनी फसवणूक करणाऱ्या महिलेची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण केले असता डॉक्टरची फसवणूक करणारी महिला नसून तो पुरुष असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.
संदेश अनिल मानकर नावाचा हा इसम अरुणोदय सोसायटी येथील एका घरी भाड्याने राहतो. त्याच्या घरी धाड टाकल्यानंतर त्याच्याकडे 1 कोटी 72 लाख 7 हजार रुपये रोख व चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 78 लाख 6198 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले.
सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ. के. ए. धरणे अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पुरी, सायबर सेल, सपोनि गजानन करेवाड, पोहवा गजानन डोंगरे, पोना विशाल भगत, उल्हास कुरकुटे, कविश पाळेकर, पोको महमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी सर्व पोलीस अधिक्षक कार्यालय, यवतमाळ यांनी पार यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरीकांनी सोशल मीडीयाचा वापर करतांना अनोळखी व्यक्तीवर त्वरित विश्वास ठेवून त्यांची मैत्री करण्याची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना सावधगिरी बाळगावी असे आवाहन यवतमाळ पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. यवतमाळचे स्थानिक पत्रकार प्रसाद नायगावकर यांनी या घटनेसंदर्भातला तपशील उपलब्ध करून दिला आहे.






























































