
नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मालामाल होण्यासाठी झारखंडमधील सायबर भामटे कुप्रसिद्ध आहे. हीच परंपरा पुढे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला कफ परेड पोलिसांनी दणका दिला आहे. त्याने शिताफीने मुंबईतील एकाची ऑनलाइन फसवणूक करून मोबाईलची खरेदी केली. पण पोलिसांनी मोबाईलसकट आरोपीला पकडून मुंबईत आणला.
अमर (नाव बदललेले) यांना एक फोन आला आणि समोरच्याने तो जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल नंबरचे केवायसी अपटेड करायचे असल्याचे सांगत त्या भामट्याने अमरला एनी डेस्क ऑप्लिकेशन डाऊनलोड करायला भाग पाडले. मग त्याने त्याआधारे अमरच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून माहिती मिळवली आणि त्या खात्यातून हजारो रुपयांची फ्लिपकार्टवर खरेदी केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच अमरने कफ परेड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश पाटील, अंमलदार प्रकाश जाधव व प्रकाश बारी या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा आरोपीने खरेदी केलेला मोबाईल झारखंडमधील आशीष वर्मा नावाची व्यक्ती वापर असल्याचे निष्पन्न झाले. पाटील व त्यांच्या पथकाने झारखंड गाठून आशीष वर्माला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने तो मोबाईल जामताराला लागूनच असलेल्या गिरडीह येथे राहणाऱ्या प्रवीणकुमार मंडल (21) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी प्रवीणला पकडल्यावर त्यानेच अमरला फसवून मोबाईल खरेदी केला आणि तो आशीषला विकल्याचे कबूल केले. जामताऱ्यातील तरुणांप्रमाणे नागरिकांना ऑनलाइन चुना लावायचा आणि मालामाल व्हायचे या हेतूने हे कृत्य केल्याचे प्रवीणने कबूल केले. पण त्याच्या पहिल्याच प्रयत्नात कफ परेड पोलिसांनी त्याला दणका दिला.






























































