
बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यात 2 वकिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट तयार केलेल्या 2011 मधील सातबाराचा वापर 2019 मध्ये करण्यात आला व फसवणूक करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रीराम अर्जुन मदने यांच्या तक्रारीवरून लातूर येथील वकील श्रीकांत एकनाथ मदने, लखण एकनाथ मदने, आकाश एकनाथ मदने, मंगल एकनाथ मदने, सुशीला एकनाथ मदने आणि संभाजीनगर येथील विधीज्ञ सविता एकनाथ मदने यांच्याविरुद्ध भादवि कलम 465, 466, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवंतपूर शिवारातील गट नं. 39 मधील शंकरराव मदने यांच्याकडून जमिन 36.42 आर खरेदी करण्यात आलेली होती. फिर्यादीच्या नावची 10 आर जमीन सातबारामध्ये कमी दाखवण्यात आली. सन 2011 मध्ये हा सातबारा तयार करण्यात आला आणि त्याचा वापर करून 2019 मध्ये संभाजीनगर खंडपीठात दावा दाखल करण्यात आलेला होता. त्यासाठी वापरण्यात आलेला सातबाराच खोटा आणि बनावट होता.
त्यामुळे फिर्यादीची तर दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आलीच परंतु न्यायालयाचीही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी लेखी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































