वासुदेव आला म्हणत …सोन्याचे दागिने घेऊन पळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रतिनिधीक

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

वासुदेव आला…वासुदेव आला असं म्हणत दारावर येऊन ‘तुमच्या समस्या काय’ विचारत सोन्याची कर्णफुले घेऊन पोबारा केल्याची घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरी पोलीसांनी तत्काळ शोध मोहिम राबवत दोघांना पकडले.

रत्नागिरीत मारुतीमंदिर येथील सुकांत चक्रदेव यांच्या घरी आज सकाळी गाणी म्हणत वासुदेव आला. सुरवातीला त्याने दारावरुन चक्रदेव यांच्या पत्नीकडे नारळ आणि तांदूळ मागितले. त्यानंतर पिण्यासाठी पाणी मागितले. पुढे घरात येऊ का असे विचारले. घरात येताच त्त्याने तुमच्या समस्या काय असे विचारले. त्यानंतर कर्णफुले काढून ती पुडीत बांधा असे त्याने सांगितले. पुडीत बांधल्यानंतर पुन्हा त्याने पाणी मागितले. त्या पाणी आणायला जाताच त्याने ती कर्णफुलांची पुडी घेऊन पोबारा केला. १३ हजार रुपये किमंतीची सोन्याची कर्णफुले चोरल्याचे लक्षात येताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला तेव्हा दोघेजण वासुदेवाच्या वेशभूषेत फिरताना आढळले. निवास भीमराव साळुंखे वय ३१ आणि किरण गंगावणे वय ३५ दोघेही रा. पुणे यांना अटक केली.

त्यांच्याकडील सोन्याची कर्णफुले जप्त करण्यात आली. अशा प्रकारे वासुदेव किंवा अन्य वेशभूषेत आपण जागृत रहा, अशा व्यक्तींचा संशय आल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले.