
हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीचा किमयागार, सामाजिक- आशयघन कलाकृती निर्माण करून नवा आदर्श निर्माण केला, असे प्रतिभावंत दिग्दर्शक-निर्माता व्ही. शांताराम यांची देदीप्यमान जीवनगाथा मोठय़ा पडद्यावर येत आहे. ‘व्ही शांताराम – द रेबेल ऑफ इंडियन सिनेमा’ हा भव्यदिव्य बायोपिक येत आहे. सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता होती ते जयश्री व्यक्तीरेखेची. ही भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला होता. ही व्यक्तिरेखा बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे.
हिंदुस्थानी सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते. यातून चित्रपटाचा भव्य स्केल, वैभवशाली मांडणी आणि त्या काळाचा समृद्ध कॅन्व्हास स्पष्टपणे दिसून येतो.

चित्रपटात ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदी यांच्या व्ही. शांताराम यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये अपार उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’च्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचे समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील गुंफण पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे.
हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.




























































