भटकंती: कर्नाटकातील प्रसिद्ध कृष्णमंदिर

Krishna-Temple-in-Karnataka

>> वर्षा चोपडे ([email protected])

कर्नाटककडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा हिंदुस्थानला मिळाली आहे. याच
कर्नाटकातील श्रद्धा आणि भक्तीचा मिलाफ असलेले सुंदर कृष्णमंदिर प्रसिद्ध आहे.

कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व 1973 मध्ये या राज्याचे नाव ‘कर्नाटक’ असे बदलण्यात आले. कर्नाटकच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्र प्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तामीळनाडू ही राज्ये येतात. कर्नाटककडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा हिंदुस्थानला मिळाली आहे.

स्वातंत्र्यानंतर साहित्यक्षेत्रात दिल्या जाणाऱया सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकात अकरा मातीचे प्रकार आढळतात. कित्तुर चिन्नमा या शूर राणीने ब्रिटिश सरकारविरोधी दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड करणाऱया पहिल्या महिला शासकांपैकी ती एक होती. त्यामुळेच ती कर्नाटकमधील लोकनायिका आणि हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनली. अशा या सुंदर राज्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनात कर्नाटकचा हिंदुस्थानात चौथा क्रमांक लागतो. त्यापैकी उडुपी अत्यंत महत्त्वाचे प्राचीन शहर मानले जाते.

उडुपी बंगळूरूपासून 60 किमी अंतरावर असलेले सुंदर पर्यटनस्थळ आहे. येथे असलेल्या कृष्णमंदिरासाठी उडुपी प्रसिद्ध आहे. जागतिक दर्जाच्या खाद्य पदार्थांसाठीही उडुपी जगप्रसिद्ध आहे. इथला समुद्र तसेच मालपे बीच अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे. उडुपीमध्ये आणि आजूबाजूला काही पर्यटनस्थळे आहेत. अत्यंत सुंदर मंदिरे आणि मठ उडुपीचे मुख्य आकर्षण आहे. पौराणिक कथेनुसार शापापासून मुक्त होण्यासाठी चंद्राने येथे शिवाची प्रार्थना केली म्हणून या ठिकाणाचे नाव उडुपी पडले. 13 व्या शतकात उडुपी शहरात श्री मध्वाचार्य यांनी कृष्ण मठाची स्थापना केली. उडुपी श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीच्या पश्चिमाभिमुख स्थितीबद्दल आणखी एक मनोरंजक आख्यायिका आहे. असे म्हणतात, ही द्वापारयुगीन कृष्णमूर्ती समुद्रात मिळाली. त्या मूर्तीची विधिवत स्थापना झाली. सोळाव्या शतकात कनकदास नावाचा एक हिंदू चर्मकार कृष्णभक्त होता. त्या काळात दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता. मुळात ही बाळ कृष्णमूर्ती संत मध्वाचार्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसवली होती. कनकदास कृष्णाचे पाठमोऱया दिशेने असलेल्या खिडकीतून कृष्णाचे दर्शन घेत असत. असे म्हणतात, त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन बाळकृष्ण स्वत पश्चिमेकडे वळले आणि खिडकीतून कनकदासाला दर्शन दिले. ही श्रद्धा आणि भक्तीची सुंदर कथा मानली जाते. तेव्हापासून बाळकृष्णाची मूर्ती तशीच मंदिराच्या आत पश्चिमेकडे तोंड करून विराजमान आहे आणि तेव्हापासूनच मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीतील त्याच नऊ छिद्रे असलेल्या खिडकीतून देवाला प्रार्थना करण्याची परंपरा सुरू झाली. यावरून हे सिद्ध झाले, देव कुठलाही भेदभाव पळत नाहीत.

मंदिराच्या गाभाऱयात गेल्यावर आपण बघू शकतो की, पूर्वीचा मुख्य दरवाजा कृष्णमूर्तीच्या मागे आहे. ‘स्वच्छता ही ईश्वरभक्तीच्या पुढे आहे’ या म्हणीप्रमाणे कृष्णभेटीपूर्वी स्नान करणे ही पारंपरिक प्रथा मानली जाते. मंदिराच्या शेजारी सुंदर तळे आहे. आतमध्ये इतरही देव आहेत. मंदिर परिसरात प्राचीन शिवमंदिर आहे. सुंदर गजरे, माळा आणि फुले महिलांचे आकर्षण आहे. मंदिरात चविष्ट प्रसाद आणि जेवण मोफत दिले जाते.

मालपे बीच, कोडी बीच आणि अनंतेश्वर, चंद्रमौलेश्वर आणि शंकरनारायण मंदिरे ही मंदिरे पर्यटकांचे आकर्षण आहे. मालपे हे एक प्राचीन समुद्री बंदर आहे, जिथे कर्नाटक आणि पाश्चात्त्य जगाचा व्यापार होत असे. समुद्रकिनाऱयावर सेंट मेरी बेट आणि भदरगड बेट तसेच बाकीच्या समुद्रकिनाऱयाचे दृश्य असलेला सी वॉकवे आहे.

उडुपी हे पारंपरिक कपडे आणि कापडाचे भांडार म्हणूनही ओळखले जाते. येथे कांजीवरम, धर्मावरम आणि बनारस सिल्क साडय़ा माफक दरात मिळतात. इथली अॅल्युमिनियमची निरनिराळी भांडी फार प्रसिद्ध आहेत.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ही उडुपीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)