
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचा आगामी चित्रपट ‘फन्ने खाँ’ यामधील ‘मेरे अच्छे दिन कब आयेंगे’, हे गाणे राजकीय दबावामुळे हटविण्यात येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या गाण्यातील ‘अच्छे दिन’ या शब्दांमुळे नेटिझन्सने भाजप सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केल्यामुळे हे गाणे हटविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या गाण्यातील शब्द बदलून आता दिग्दर्शक निर्मात्यांनी ‘मेरे अच्छे दिन अब आये रे’ असे करत नवीन गाणे सादर केले आहे.
‘फन्ने खाँ’ मधील मेरे अच्छे दिन कब आयेंगे हे गाणे २० जुलै रोजी सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यात आले. या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेल्या ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाची आठवण झाली असून त्यावरून नेटिझन्सने सरकारला ट्रोल केले आहे. या गाण्यावरून सुरू असलेले हे ट्रोलिंग थांबविण्यासाठी दिग्दर्शक अतुल मांजरेकर यांनी या गाण्यातील शब्द बदलून नव्याने हे गाणे रिलीज केले आहे.
‘आमच्या गाण्याला राजकीय रंग देत त्यावरून ट्रोलिंग करण्यात येत होते. हे गाणे तयार करताना आम्हाला ती पंतप्रधानांची घोषणा आहे, हे लक्षात आले नव्हेत. या गाण्यावर अशा प्रकारे प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती. त्यामुळे आम्ही या गाण्याचे काही बोल बदलून नव्याने गाणे प्रसिद्घ केले आहे’, असे मांजरेकरांनी म्हटले आहे.\






























































