फार्म हाऊसवर दोन तरूणांना अमानुष मारहाण प्रकरण

849

वाढदिवसाच्या पार्टीत चांगला डी.जे. वाजविला नाही म्हणून डी.जे.वादक दोन तरूणांना फार्म हाऊसवर डांबून, विवस्त्र करुन मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या सहा गुंडांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यात फार्म हाऊस मालक भाजपाचा पदाधिकारी निखील पवार याचाही समावेश आहे. आज प्रकाश वाघ या गुंडाला अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार संदेश काजळे याच्यासह त्याचे आणखी साथीदार फरार आहेत.

पंचवटीतील सराईत गुन्हेगार संदेश काजळे याच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा पदाधिकारी निखील पवार याच्या दरी येथील फार्म हाऊसवर गुरुवारी रात्री पार्टी आयोजित करण्यात आली होती. डी.जे. चांगला वाजविला नाही म्हणून गुरुवारी रात्रभर, शुक्रवारी सकाळी साडेसातपर्यंत दोन तरूणांना विवस्त्र करून पंधरा गुंडांनी अमानुष मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी फार्म हाऊस मालक निखील पवार, प्रीतेश काजळे, संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भाळवकर या सहाजणांना अटक केली. रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

रविवारी याप्रकरणी सिडकोतील शुभम पार्क येथे राहणारा प्रकाश वाघ याला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार संदेश काजळे याच्यासह त्याचे आणखी साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील संशयित निखील पवार हा भाजपाच्या एका महिला आमदाराचा अत्यंत जवळचा समर्थक आहे. या महिला आमदाराच्या हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध बोंब ठोकणारे भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि बोलघेवडे पदाधिकारी यांनी मात्र या प्रकरणात तोंड बंद ठेवल्याने भाजपाच्या भूमिकेबाबत उलटसूलट चर्चा होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या