शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन; शेतमालाची खरेदी विक्री सौद्यातच करण्याची मागणी

372

लातूर बाजारसमिती परिसरात शेतमालाची खरेदी -विक्री सौद्यातच करावी, पोटली आणि कडता बंद करावा, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी बाजार समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून बाजार समिती परिसरात शेतमालाचा सौदा न करता पोटलीच्या नावाखाली खरेदी करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 400 ते 500 रुपये नुकसान होत आहे. यासाठी पोटलीचा व्यवहार बंद करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने वारंवार केलेली आहे. त्या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे. परंतु बाजार समिती प्रशासन पोटली व्यवहार बंद करण्याबाबत उदासीन असल्याचे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी बाजार समितीसमोर धरणे आंदोलन करून सभापतींना निवेदन देण्यात आले.

पोटलीसोबतच कडताही बंद करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शेतमालाची खरेदी विक्री करताना सौद्यात जो भाव ठरेल त्याच भावाने खरेदी केली जावी. मालाच्या प्रतीनुसार जो दर निघेल तो दिवसभर लागू केला जावा. मालाचा दर्जा तपासण्यासाठी समितीने ग्रेडरची नेमणूक करावी. इनामच्या माध्यमातून खरेदी विक्रीचे व्यवहार केले जावेत त्यामुळे देशभरातील व्यापारी खरेदी विक्रीच्या व्यवहारात उतरू शकतील. स्पर्धा वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, रुपेश शंके, बालाजी जाधव, हरिशचंद्र सलगरे, बाबाराव पाटील, धर्मराज पवार, अशोक पाटील, विठ्ठल संपते, केशव धनाडे, किशनराव शिंदे, वामनराव शिंदे आदींसह असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या