बाणेर आठवडी बाजारात गुंडगिरी; शेतकऱ्याला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

आठवडी बाजारात भाजी विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला भाजी विक्री करण्यास मज्जाव करून काही जणांनी गुंडगिरी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना बाणेर येथे घडली आहे. या प्रकरणानंतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.

बाणेर येथील गेरा सोसायटीच्या परिसरात कोरडवाहू उत्थान फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून दर रविवारी दुपारी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून आठवडी बाजार भरवला जातो. लोणी काळभोर येथील काहीजण या बाजारात आले. त्यांनी बाजार आयोजक सागर उरमुडे यांना तुम्ही स्वत: बाजार चालवता, तुम्ही कंपनी सभासद नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या बाजारात भाजीपाल विक्री करु नये असे म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बाजारातील इतर शेतकरी त्यांच्या मदतीसाठी गेले असता, त्यांना कोणी मध्ये पडला तर तुम्हाला पुण्यामध्ये येऊ देणार नाही, तुम्ही नगरमधून येऊन आमच्या पोटावर पाय देता तुम्हाला पुन्हा नगरला पाठवू’ अशी धमकी दिली. याबाबत सागर उरमुडे म्हणाले, कोरडवाहू उत्थान फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून महापालिका आणि पणन विभागाच्या परवानग्या घेऊन हा आठवडी बाजार चालविला जातो. सुमारे 30 हून अधिक सभासदांनी या मारहाणीविरोधात तक्रार देऊनही केवळ अदखलपात्र गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांना विचारले असता हा किरकोळ प्रकार आहे. काही जण तक्रार देण्यासाठी आले होते असे सांगितले. मात्र, भर बाजारात शेतकऱला धमकावून मारहाण करणे हा किरकोळ प्रकार आहे का? यामुळे समाजात दहशत निर्माण होत नाही का? असे विचारले असता यावर चौकशी करतो असे उडावाउडवीचे उत्तर ढोमे यांनी दिले.