नापिकीला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जिंतूर

तालुक्यातील दहेगाव येथील एक ३० वर्षीय तरुण शेतकर्‍याने सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील दहेगाव (ढोणे) येथील रहिवाशी अशोक एकनाथ ढोणे (३०) हे आपल्या वडिलोपार्जित शेतीवर मेहनत करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने उधारी उसनवारी तसेच खाजगी कर्ज घेऊन शेतात पेरणी केली होती. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे ऐन जोमात असलेली पिके सुकत असल्याने हाता तोंडाशी घास हिरावला जातो की काय? याच विवंचनेत ते होते.

यातच त्यांच्या आई- वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शेतीवर घेतलेले कर्ज होते. हे कर्जमाफ होईल व नवीन कर्ज मिळेल या आशेवर असतांना अजूनही कर्ज माफी झाली नाही. म्हणून अधिकच निराश  झाल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा याच विवंनचतेत त्यांनी १२  ऑगस्ट रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र प्रकृती त्यांची प्रकृती खालावल्याने प्रथोमोपचार करून परभणी येथे हलविण्यात आले होते. परंतु जिल्हा रुग्णालयात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. याबाबत घटनेची सायंकाळी उशीरापर्यंत बामणी पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.