
सामना प्रतिनिधी। परभणी
परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. परभणी तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथे एका शेतकऱ्याने सततच्या नापीकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. तुकाराम आश्रुबा रसाळ (३२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.
पोलिसांनी तुकारामचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. दरम्यान, तुकारामला गेल्या काही दिवसांपासून सततच्या नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्याने आपली जीवनायात्रा संपविली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.





























































