शेत राखायला गेलेल्या शेतकरी दाम्पत्याची निर्घृण हत्या, वर्धा जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्धा जिल्ह्यातील घोराड येथे शेत राखायला गेलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. महादेव खिरडकर (60) आणि लक्ष्मी खिरडकर (55) अशी हत्या झालेल्या शेतकरी दाम्पत्याची नावेआहेत. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. संपत्तीच्या वादातून अथवा आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील घोराड येथील रहिवासी महादेव खिरडकर यांच्या मालकीची डोरली शिवारात सात एकर जमीन आहे. या शेतीवर त्यांची उपजीविका चालत होती. सध्या शेतात हरभराचे पिक असल्याने दोघेही पती-पत्नी पिक राखायला थांबले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून त्याची हत्या केली. हा प्रकार रविवारी घडला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.

खिरडकर शेतकरी दाम्पत्य आपल्या दोन मुलांपासून वेगळे राहात होते. त्यांचे दोन्ही मुळे गावातच राहतात. हरभरा पिकाचे राखन करण्यासाठी गेले असताना त्यांची रविवारी रात्री हत्या झाली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह सापडले तेव्हा परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. खिरडकर यांचे शेत रस्त्यापासून बरेच आत असल्याने त्याकडे कोणी फिरकले नसल्याने हा प्रकार उशिरा उघडकीस आला.

दरम्यान, या घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना दिली असून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाढे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठसे तज्ञ तसेच श्वानपथकाला येथे पाचारण करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधीक्षक बसवराज तेली, गुन्हे अन्वेषण विभागाचे नीलेश ब्राम्हणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.