जालन्यामध्ये तलावात बैलगाडीसह बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रजाळा येथे तलावात बैल गाडीसह बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. राजू पांडुरंग साळवे ( वय 47) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजु साळवे शेतामध्ये जनावरांसाठी पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावाकडे बैल गाडीसह एक गाय नेत असताना अचानक बैल जोडीने बैल गाडी तलावात ओढल्यामुळे तुडूंब भरलेल्या तलावात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेमध्ये एका गायीचाही मृत्यू झाला असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी राजु साळवे यांना तलावामधून तात्काळ बाहेर काढून बैलांचा कासरा तोडून बाहेर काढल्यामुळे बैलजोडी बचावली आहे. राजू साळवे यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने भोकरदन तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या