वांगी 20 पैसे किलो; राहात्यातील शेतकऱ्याने दोन एकर शेतातील वांगी उपटून फेकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अशोक सदाफळ, राहाता

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागची साडेसाती संपता संपत नाही. पावसाने दडी मारल्यानंतर आता पिकांच्या भावाने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा, टोमॅटोपाठोपाठ वांग्याचेही भाव गडगडल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राहाता तालुक्यातील साकुरी येथील शेतकऱ्याच्या वांग्याला किलोला 20 पैसे भाव मिळाल्यामुळे त्याने दोन एकर शेतातील वांग्याचे पीक उपटून फेकले. या शेतकऱ्याला सुरत बाजारपेठेत 26 कॅरेट वांग्याचे फक्त 66 रुपये मिळाले.

बाराही महिने हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून साकुरी येथील शेतकरी राजेंद्र बावके यांनी उन्हाळय़ात दोन एकर शेतात वांग्याचे पीक घेतले. यासाठी बावके यांना तब्बल 2 लाख रुपये खर्च आला, मात्र झाडांना वांगी आल्यानंतर भाव पडले. वांग्याला सुरत बाजारपेठेत चांगली मागणी असते, मात्र तेथे मागणीच नसल्याने पाठविलेली वांगी मातीमोल भावाने विकली गेली.

बाजारात शेतमालाच्या कोणत्याच वस्तूला भाव नाही. जुना कांदा चाळीत सडतो आहे तर नवा कांदा शेतात पडून आहे. टोमॅटोला भाव नसल्याने तो रस्त्यावर किंवा शेताच्या कडेला फेकावा लागत आहे. भाजीपाल्याचीही तीच गत आहे. वांगी उपटून टाकण्यासाठीही बावके यांना 12 हजार रुपये मजुरी द्यावी लागली.