पाथरीत पिकविम्याचा बळी; शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात हृदयविकाराने मृत्यू

67

सामना प्रतिनिधी । पाथरी

पाथरी तालुक्यातील एका शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यावरील नाव अचानकपणे वगळण्यात आल्याने तणावात असलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक (वय 55) हे विमा भरण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे आले होते. त्यांची तुरा येथील (गट क्रं.131) मधील मालकीच्या जमीनीचा सातबारा आणण्यासाठी ते सज्जाचे तलाठी यांच्या पाथरी येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना तलाठी यांनी तुमचे नाव सातबारा उताऱ्यावर नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पाथरी तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्याकडे सातबारा उतारा नाव कमी झाल्याची तोंडी तक्रार केली होती. तहसीलदार यांच्या भेटीनंतर तलाठी यांच्या कार्यालयात मुंजाभाऊ चाळक गेले होते. यावेळी आता पीकविमा कसा भरणार या विंवचनेत असणाऱ्या मुंजाभाऊ यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाथरी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

या प्रकरणी तुरा येथील शेतकरी आणि मृत शेतकऱ्याचे नातेवाईक पाथरी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता संबंधीत तलाठी व मंडळाधिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त जमावाने शेतकऱ्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातुन पाथरी तहसिल कार्यालयात नेण्याचा इशारा दिला. त्यानंतर पाथरी ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपक शिंदे यांनी संबंधिंतावर गुन्हा दाखल करण्याचे अश्वासन दिले. आमदार बाबाजानी दुर्राणी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, उपविभागीय अधिकारी व्हि.एल कोळी, तहसिलदार भाग्यश्री देशमुख, राजन क्षिरसागर यांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सज्जाचे तलाठी तसेच संबंधीत दोषींवर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबीत करा, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरु होती.

आपली प्रतिक्रिया द्या