
बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील झोळेकर वस्तीजवळ रविवारी रात्री घडली. संतोष कारभारी गावंडे (वय 45) असे मृताचे नाव आहे.
संतोष गावंडे हा रविवारी मध्यरात्री झोळेकर वस्तीजवळील धामणगाव आवारी रस्त्यावरील शेतातील काम उरकून घरी जात होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून शेजारच्या उसाच्या शेतात नेऊन त्याचे पोट फाडले. हा प्रकार आज सकाळी समोर आला. यानंतर पोलीस पाटील प्रणाली धुमाळ यांनी पोलीस व वन विभागाला माहिती दिली. वनाधिकारी भाग्यश्री पोले, वनपाल पारधी, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे, धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ यांनी घटनास्थळी भेट दिली. c
…अन्यथा वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालणार
धुमाळवाडी, धामणगाव आवारी शिवारात वन विभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबटय़ांचा बंदोबस्त करावा; अन्यथा ग्रामस्थ व शिवसेनेच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिला आहे.
धुमाळवाडी, धामणगाव आवारी गावांत बिबटय़ांचा वावर वाढलेला आहे. आम्ही पिंजरा लावण्याची वन विभागाकडे मागणी केलेली आहे. आता बिबट्याने मनुष्यालाच मारल्याने हा बिबट्या नरभक्षक झाला आहे. परिसरातील नागरिकांना मोठा धोका असल्याने वन विभागाने तत्काळ दखल घेत पिंजरा लावावा.
– डॉ. रवींद्र गोर्डे, सरपंच, धुमाळवाडी.
धुमाळवाडी येथील घटनेत प्रथमदर्शनी बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातच झाल्याचे सिद्ध झाल्यावर वन विभागाकडून मृताच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य दिले जाईल. यासह या भागात पिंजरा लावण्यात येईल.
– भाग्यश्री पोले, वनक्षेत्रपाल, अकोले.


































































