
अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व घरपडझड झालेल्या बाधितांना राज्य शासनाने मंजुर केलेला निधी तात्काळ नुकसानग्रस्त व बाधितांना देण्याच्या सूचना पाटणच्या तहसिलदारांना देण्यात आल्या आहेत. लवकरच नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्त आणि बाधितांना मिळेल, असा विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
पाटण तालुक्यात ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. तर जुलै-ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे ग्रामीण आणि डोंगरी भागातील घरांची मोठया संख्येने पडझड झाल्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच घराची पडझड झालेल्या बाधितांना आर्थिक मदत मंजुर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आमदार शंभूराज देसाई यांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 2 कोटी 24 लाख व घरपडझड झालेल्या बाधितांना एकूण 1 कोटी 53 लाख 56 हजार 400 रुपये अशी एकूण 3 कोटी 77 लाख 56 हजार 400 रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून सर्व मदत पाटणचे तहसिलदार यांच्याकडे शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशानुसार नुकसानग्रस्तांना देण्याकरिता वर्ग केल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमध्ये पडझड झालेल्या एकूण 2500 घरांचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये 2496 कच्ची घरे व 4 पक्क्या घरांना आवश्यक असणारी मदत मिळावी याकरीता निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 1 कोटी 53 लाख 56 हजार 400 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदेशावरुन विभागीय आयुक्त यांच्याकडे जमा करण्यात आलेल्या मदतीतून जिल्हाधिकारी,(सातारा) यांना जिल्हयातील सर्व तालुक्यांना मदत मंजुर करण्यात आली आहे.


































































