
टीम इंडियाचा माजी खेळाडू, ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) गंभीर आरोप केले आहे. कारकिर्दीच्या शेवटी बीसीसीआयची वागणूक अव्यावसायिक होती, असा आरोप युवीने केला आहे. तसेच युवीने अनेक माजी खेळाडूंचाही उल्लेख केला आहे ज्यांच्यासोबत कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात बीसीसीआयची वागणूक चुकीची होती.
युवराज सिंह याने कॅन्सरवर मात केल्यानंतर 2017 ला एक दिवसीय संघात कमबॅक केले होते. मात्र साल 2019 येईपर्यंत त्याचा खेळ पूर्वीप्रमाणे राहिला नाही. 2019 च्या वर्ल्डकपसाठी टीम मॅनेजमेंट चौथ्या स्थानासाठी योग्य फलंदाजाच्या शोधात होती. मात्र एक दिवसीय क्रिकेटमध्ये 41.33 ची सरासरी असतानाही युवीला फिटनेसमुळे संघात स्थान मिळाले नाही. तसेच तो यो-यो टेस्ट देखील पार करू शकला नाही. एवढे होऊनही बीसीसीआयने युवीला फेअरवेल सामना खेळण्याची ऑफर दिली मात्र युवीने ती फेटाळली. यानंतर त्याने यो-यो टेस्ट पास केली, मात्र तोपर्यंत मॅनेजमेंटने आपला निर्णय घेतलेला होता. वर्ल्डकप दरम्यानच युवीने क्रिकेटला रामराम ठोकला. आता एक वर्षाने त्याने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

‘माझ्यासोबतही तसंच घडलं’
‘स्पोर्ट्सकिडा’शी बोलताना युवीने बीसीसीआयवर निशाणा साधताना म्हटले की, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे मला धक्का बसला नाही, कारण याआधी वर्ल्डकप जिंकून दिलेल्या हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांच्यासोबत देखील असेच घडले होते. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात क्रिकेट बोर्डाची वागणून अव्यावसायिक होती, असेही युवी म्हणाला. मात्र भविष्यात बीसीसीआयने त्या खेळाडूंना योग्य सन्मान द्यावा ज्यांनी देशासाठी दीर्घ काळ क्रिकेट खेळले, अशी मागणीही युवीने केली. गौतम गंभीरने देशाला 2 वर्ल्डकप जिंकून दिले, सुनील गावस्कर यांच्यानंतर वीरेंद्र सेहवाग टेस्ट क्रिकेटमध्ये मॅच विनर राहिला. तसेच व्हीव्हीएस लक्ष्मण आणि झहीर खान यांनाही सन्मान मिळायला हवा, असेही युवी म्हणाला.

युवीची दमदार कारकीर्द
युवराज सिंग याने हिंदुस्थानकडून 40 कसोटी, 304 एक दिवसीय आणि 58 टी-20लढती खेळल्या. कसोटीत त्याने 1900, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 8701 आणि टी-20 मध्ये 1177 धावा चोपल्या. तसेच कसोटीत 9, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 111 आणि टी-20 मध्ये 28 बळी घेतले. 2007 आणि 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा तो सदस्य होता



























































