शेतकऱ्यांचे डिपीचे प्रश्न वाढले; महावितरणचे दुर्लक्ष

568

परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीने जळालेल्या डिपी देण्यास असमर्थता दर्शवित शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज महावितरण कंपनीला धारेवर धरले. तसेच या डिपी प्रश्नाबाबत हजारो शेतकऱ्यांसहित सोमवार, 16 डिसेंबर रोजी परभणी येथे महावितरण कंपनीसमोर खासदार संजय जाधव धरणे आंदोलन करणार आहेत.

सध्या रब्बी हंगामाची पेरणी चालू असून गहू, हरभरा, करडी, ज्वारी या पीकांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु परभणी जिल्ह्यात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. यातच डिपीचे प्रश्नही वाढले आहेत. शेतातील विहिरीत आणि बोअर मध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा शेतकऱ्यांना पीकांना पाणी देता येत नाही. एक तर विद्युत पुरवठा नसतो आणि अनेक ठिकाणी डिपी जळालेल्या असतात. तक्रार करूनही उपयोग होत नाही. शेतकऱ्यांनी खासदार या नात्याने संजय जाधव यांच्याकडे डिपीच्या प्रश्नासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे चक्क दुर्लक्ष केल आहे. गुत्तेदार मंडळीमध्ये मशगुल असलेल्या या महावितरण कंपनीला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अनेक गावच्या डिपी जळाल्या असून त्या दुरुस्ती करून देण्यास महावितरण कंपनीन असमर्थ ठरत आहे. एक तर वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असतानाच महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना जाणिवपूर्वक कार्यालयात आल्यानंतर दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंतासुद्धा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. या सर्व प्रश्नावर शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज अधीक्षक अभियंता बाबुराव बनसोडे यांना दुरध्वनीद्वारे जाब विचारला असता बनसोडे यांची उत्तरे बेजबाबदारपणाची होती. त्यामुळे खासदार संजय जाधव यांनी सोमवारी अधीक्षक अभियंता कार्यालयसमोरच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसमवेत आणि कार्यकत्र्यांसमवेत हे आंदोलन होणार आहे.

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी खालील मागण्या केल्या आहेत.
सध्या शेतकऱ्यांना नवीन कनेक्शनसाठी कोटेशन देणे महावितरण कंपनीने बंद केले आहे. ते पूर्ववत सुरु करण्यात यावे. शेतकऱ्यांचे जळालेले व गावठाणचे डिपी रब्बी पीके घेण्यासाठी वेळेवर देण्यात यावेत. जळालेल्या डिपी शेतकऱ्यांना स्वत:ला स्वखर्चातून महावितरणकडे ने-आण करावी लागते. ती रोखण्यात यावी, ग्रामीण भागातील व गावठाण भागातील अनेक गावे महिन्यापासून अंधारात आहेत, त्या गावांना आंधारमुक्त करण्यात यावे, डिपीवरील फ्युज आणि केबलचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या एका डिपीवर 40 ते 50 कनेक्शन असल्यामुळे डिपी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी नवीन डिपी देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या प्रकरणी स्वत: महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बनसोडे यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना जाणिवपूर्वक वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, दिवसेंदिवस महातिवरण कंपनीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हेळसांड होत असून ती त्वरीत थांबवावी, अशा विविध मागण्या खासदार संजय जाधव यांनी केल्या आहेत.

रात्रीच लाईट येते; शेतकरी त्रस्त
सध्या रब्बी पीके हरभरा, गहू, ज्वारी, करडी आदींसाठी शेतकऱ्यांना पाणी द्यावे लागत आहे. परंतु विद्युत पुरवठा दिवसभर नसल्याने त्यांना रात्री उशिरा पीकांना पाणी द्यावे लागते. आठ दिवस रात्री 10.30 वाजता विद्युत पुरवठा सुरु होतो आणि सकाळी ६ वाजता बंद होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर पीकांना पाणी द्यावे लागते. या गंभीर प्रकारामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. हा अन्याय आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर पून्हा रात्रभर विद्युत मंडळाच्या अवकृपेने जागावे लागत असल्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. साप, विंचू, जंगली प्राणी आणि रात्रीचा किर्रर… अंधार शेतकऱ्यांचे जगने मुश्किल करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या