शेतकऱ्यांनो, घाबरू नका; लवकरच मिळेल नुकसानभरपाई ! उद्धव ठाकरे यांचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘साहेब… जगण्यासाठी काहीच राहिले नाही, हातातोंडाशी आलेल्या पिकांचा परतीच्या पावसाने चिखल झाला. कोणीही बघायला आले नाही. तुम्हीच आलात, आता तुम्हीच आम्हाला वाचवा,’ अशा शब्दांत अनेक शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे परिस्थिती मांडली. तेव्हा आश्वासक हात शेतकऱ्यांच्या पाठीवर ठेवत ‘खचू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. सातबारा कोरा करणारच, तसेच तुम्हाला लवकरच नुकसानभरपाई मिळेल,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

परतीच्या पावसाने सांगली, सातारा जिह्यांतील अनेक तालुक्यांत धुमाकूळ घातला त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली जिह्याच्या दौऱ्यावर आले, त्यांनी खानापूर तालुक्यातील विटा आणि कडेगाव तालुक्यातील नेवरी तर सातारा जिल्हय़ातील मायणी, कातरखटाव, काटेवाडी, ललगुण, ताथवडे, फलटण, तरडगाव, लोणंद येथील परतीच्या पावसाने बाधित झालेल्या शेतीची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना आधार दिला.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेनेने तालुकानिहाय शेतकरी मदत केंद्र उभे केले आहेत. विटा येथील अशाच एका शिवसेनेच्या मदत केंद्रास उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन तेथील कामाची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या.

शिवसेनेच्या या मदत केंद्राचा काही उपयोग होतो का? असा प्रश्नही त्यांनी शेतकऱ्यांना विचारला, ‘तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी या केंद्राची खूप मदत झाल्याचं सांगितलं’, ‘हे तुमच्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणून या सोयी उपलब्ध केल्या आहेत, याचा उपयोग करून घ्या, काही चिंता करू नका, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील’, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आधार दिला.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री विजय शिवतारे, सांगली, सातारा जिह्याचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील, सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, आमदार विश्वजीत कदम, मोहनराव कदम आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी सातारा जिह्यातील मायणी, कातरखटाव, काटेवाडी, ललगुण, ताथवडे, फलटण, तरडगाव,  लोणंद आदी ठिकाणी अतिवृष्टी व परतीच्या पावसाच्या धुमाकुळामुळे झालेल्या अपरिमित नुकसानीची शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या वेदना जाणून घेतल्या.

वाकू नका, खंबीर होऊन जगा…

परतीच्या पावसाने संपूर्ण द्राक्षबाग उद्ध्वस्त झाल्याने खचलेले विटा येथील तरुण शेतकरी दादासाहेब पांडुरंग पवार यांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले, यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पाठीवर मायेचा हात ठेवून धीर दिला. ‘मोठय़ा कष्टातून गेल्या तीन वर्षांपासून आपण ही बाग फुलवली होती. आता कुठे बाग छाटणीला आली होती; परंतु पावसाने बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे मी पुरता उद्ध्वस्त झालो आहे मला वाचवा’, अशी विनवणी दादासाहेब पवार या शेतकऱ्याने केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘याबाबतची सर्व माहिती माझ्याकडे द्या, मी तुमच्या पाठीशी आहे’, असे सांगत धीर दिला. एवढय़ात, ‘सरकारने मदत करायला पाहिजे’, अशी मागणी एका शेतकऱ्याने करताच, ‘आधी मला तुम्हाला उभं करायचं आहे.’ असा विश्वास देत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची मनं जिंकली, यावेळी शेतकरी त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू लागले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना थांबवत, ‘असं वाकू नका.. खंबीर होऊन जगा…’ असा सल्ला दिला.

शिवसेनेचे सरकार यावे – अनवाणी पदयात्रेने साकडे

महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार सत्तेवर यावे यासाठी शक्ती पीठ ते भक्ती पीठ अशी बनशंकरी ते पंढरपूर अनवाणी 80 किलोमीटर पदयात्रा काढत संजय आणि रुपाली सावंत या वारकरी दांपत्याने श्रीविठ्ठलचरणी साकडे घातले. सांगली जिह्यातील जत तालुक्यातल्या बनाळी येथील या दांपत्याने आज विटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि प्रसाद म्हणून तुळशीची माळ त्यांना दिली. संजय सावंत हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आहेत. यावेळी या वारकरी दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना त्याठिकाणी विणा आणि तुळशी वृंदावन घेऊन आम्हाला हा सोहळा पाहण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांची मागणी मान्य केली.

शेतकऱ्यांच्या डोळय़ांत अश्रू तरळले…

विटा परिसरातील प्रकाश गायकवाड या शेतकऱ्याच्या उद्ध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली. घडात मणी भरण्यापूर्वीच बाग उद्ध्वस्त झाल्याचे गायकवाड यांनी सांगताच काही क्षण उद्धव ठाकरेही सुन्न झाले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची फार मोठी कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं करावेच लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी आत्ता तुम्हाला आधार द्यायला आलो आहे. मदत केली जाईल, पण थोडं थांबा, धीर सोडू नका, खचू नका. या संकटात शिवसेना तुमच्यासोबत आहे’, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी देताच शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.