पंतप्रधान मोदींनी स्टॅलिनप्रमाणे शेतकऱ्यांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगवू नये! – राजू शेट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेती प्रश्नावरूनच चाळीस वर्षांपूर्वी पंजाब धगधगता राहिला. तत्कालिन केंद्र सरकारने आणि पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांनी ते नीट समजावून घेतले नाही. शेतकऱ्यांची पोरं असामाजिक तत्त्वांच्या हातात गेली. त्यावेळी पंतप्रधानांना गमवावे लागले. आताही पंजाबच्या या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. पंतप्रधान मोदी यांनी स्टॅलिनप्रमाणे शेतकऱ्यांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगवू नये असा सल्लावजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, भाजपच्या वाचाळवीर नेत्यांमुळे हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आंदोलन मोडून काढण्याची चूक करू नये, अन्यथा त्याची फार मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.

शेतकरी एकटा नाही!

सरकारने लादलेली तीन कृषी कायदे मागे घेतल्या शिवाय आणि हमीभावाचा कायदा केल्याशिवाय मागे हटायचं नाही असा शेतकऱ्यांचा निर्धार असून दिल्लीत चारही बाॅर्डरवर लाखांच्या संख्येने शेतकरी आंदोलनात बायका पोरांसह गेले वीस दिवस ठाण मांडून बसले आहेत. कडकडीत हिंदुस्थान बंद पाळून जनतेने आंदोलनाला समर्थन दिले आहे. शेतकरी एकटे नाहीत, तर सारा देश त्यांच्या पाठीमागे आहे. आंदोलन केवळ एका कोपऱ्यातले नाही, तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचे असल्याचे यातून दाखवून दिले आहे.

शेतकरी आपल्या मुद्द्यावर ठाम

अशात एकिकडे शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची तर दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीने फूट पाडायचा प्रयत्न्न सरकार कडून केला जात आहे. त्याला जातीय, प्रांतीय रंग देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांना पाकिस्तानी, नक्षलवादी, खलिस्तानवादी असे सगळे म्हणून झाले तरी शेतकरी आजही आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचे राजु शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

तेव्हा पंतप्रधानांना गमवावे लागले

चाळीस वर्षांपूर्वी असाच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन केंद्र सरकार आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो नीट समजावून घेतला नाही. त्यामुळे काही असामाजिक तत्वांच्या आणि खलिस्तानवाद्यांच्या हाती शेतकऱ्याची पोरं गेल्याने पुढे पंजाब धगधगता राहिला. तत्कालीन पंतप्रधानांना गमवावे लागले.

अन्यथा सरकारला किंमत मोजावी लागेल

आजही अतिशय शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाचा भडका केंव्हाही उडू शकतो. यातून जर काही असामाजिक तत्वांच्या हाती शेतकऱ्यांची पोरं गेली तर पुन्हा एकदा पंजाबच्या या इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी भिती राजु शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यात हे आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला तर ही चूक करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

दानवे यांना मत दिले ते योग्य काय?

देशाचे नागरी पुरवठा मंत्री असलेल्या दानवे यांचे खाते म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाशी निगडित आहे. याच मंत्रालयाचा एक माणूस त्याच्या खात्यात अशा चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर बरा-वाईट परिणाम होत असताना आंदोलनाविषयी चुकिची व बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर ते अतिशय निषेधार्ह आहे. कायम अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीची वक्तव्य करणारे दानवे याना मत देणाऱ्या शेतकऱ्यांनाही आपण योग्य माणसाला मत दिले आहे का असा सवालही राजु शेट्टी यांनी यावेळी केला.