दहा वर्षांत दीड हजार रुग्णांना दृष्टी, शेतकरी रमेश सोळंके यांचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजलगाव । सुधीर नागापुरे

आपल्याला दृष्टीलाभ झाल्याने आता त्याचा फायदा समाजाला व्हायला पाहिजे. हा हेतु मनात बाळगून स्वतःची शेती सांभाळून ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना मुंबईत नेऊन तब्बल दीड हजार जणांना दृष्टी देण्याचे काम एका ६४ वर्षीय शेतकऱ्याने केले आहे. रमेशराव सोळंके असे त्या अवलियाचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील रहिवासी आहेत.

माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील रमेशराव सर्जेराव सोळंके हे पिढीजात शेतकरी कुटुंब असून त्यावरच त्यांची उपजीविका आहे. मागील दहा वर्षांपूर्वी त्यांना डोळ्यात मोतीबिंदू झाल्याने दृष्टी धुसर झाली, त्यामुळे त्यांनी थेट मुंबई गाठून जे.जे.रुग्णालयात डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडून डोळे तपासणी करू घेतली व त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, तेही अगदी मोफत. डॉ लहाने यांच्या हातून परत दृष्टी मिळाल्याने सोळंके यांना आनंद झाला. व त्यांनी आपण या शासकीय रुग्णालयात गोरगरीब लोकांना अगदी अल्प पैशात म्हणजे फक्त जाण्या-येण्याच्या खर्चात दृष्टी मिळवून देऊ शकतो लोक इतर छंद करतात तर आपण असा वेगळा छंद का करू नये असा विचार केला व तसा संकल्प केला. त्यावेळेपासून तब्बल दहा वर्षे झाले त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

ग्रामीण भागात डोळ्यांचे रुग्ण कोण आहेत याची माहिती घेऊन त्यांना महिन्यातील एका सोमवारी माजलगाव येथून परिवहन महामंडळाच्या बसने परतूर येथे न्यायचे तेथून रेल्वेने थेट मुंबई. जे.जे.रुग्णालयात या रुग्णांची डॉ लहाने व डॉ रागिणी पारीख हे स्वतः तपासणी करतात व मंगळवारी शस्त्रक्रिया करतात  व बुधवारी सुट्टी देतात. या तीन दिवसांत राहणे-खानेही मोफत. त्यामुळे रुग्णास अवघा एक हजार रुपये खर्च येतो. दुसरीकडे खाजगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. शासकीय रुग्णालयात गोरगरीबांसाठी तर परवडणारे आहेतच परंतु रमेशराव सोळंके यांनी लोकांना हे पटवून दिल्याने आता सधन लोकही रमेशराव यांच्यासोबत मुंबईला जाऊन शस्त्रक्रिया करत आहेत. आतापर्यंत १५०० रुग्णांना मुंबईत नेऊन दृष्टी देण्याचे काम सोळंके यांनी आपली शेतीवाडी सांभाळून केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेण्याची गरज आहे.