नापिकीमुळे शेतकर्‍याची आत्महत्या, मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात

535

जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या सिद्धनाथपूर येथील शेतकर्‍याने नापिकीमुळे आत्महत्या केली. सुधाकर महादेव पाटेकर असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी बराच काळ जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवला होता. मात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयातून हलविण्यात आला.

सुधाकर पाटेकर यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना त्यांना अमरावतीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. या ठिकाणी पाटेकरांचा मृतदेह ठेवून अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर त्वरित मदत दिली जाईल असे मान्य केले.त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह तेथून हलविला. पाटेकर यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यात सोयाबीन लागवड केली आहे.परंतु पावसामुळे सोयाबीन खराब झाले. पाटेकर यांच्या वडिलांचा एक महिन्यापुर्वीच मृत्यू झाला. त्यांचे पश्श्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या