
शेतकरी हवालदिल होत चालला असून आत्महत्यांचे सत्र थांबता थांबायला तयार नाही अशी अवस्था जिल्ह्यात झाली आहे. जिल्हयात परतीच्या पावसाने दणका दिल्याने शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबायला तयार नाही. सततच्या नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गोगलगांव (ता.राहाता ) येथील तरुण शेतकर्याने गुरूवारी गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे.
शेतकरी कधी पाऊस नसल्याने तर कधी जास्त पाऊस आल्याने हवालदिल होत असून यातून सुटका कधी होणार या विविचनेत तो आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. राहता येथील शेतकरी रवींद्र लक्ष्मण मगर (वय 30) असे या शेतकर्याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता. रवींद्र याला एक भाऊ असून ते शेती करत होते. दोघा भावात मिळून रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे.
वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे हिरावून घेतले आहे. यातुन रवींद्र हा वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे.
गोगलगाव येथे गेल्या 6 महिन्यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना थांबायला तयार नाही. एका मागोमाग एक महिन्याभरात अशा घटना घडत असल्याने शेतकर्यांना कोणी वाली उरला की नाही अशीच अवस्था शेतकर्यांची झाली आहे.




























































