जालन्यातील भोकरदनमध्ये कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

555

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील समाधान शेनफड साबळे ( वय 36) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.  समाधान साबळे या शेतकऱ्याने स्टेट बँक ऑफ हैदराबादकडून चार ते पाच लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांनी इतर ठिकाणांहूनही कर्ज घेतले होते.  यंदा कर्ज घेऊन त्यांनी शेती केली होती. मात्र, परतीच्या पावसाने फटका दिल्यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरणार अशी चिंता त्यांना होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते असे सांगण्यात आले. ते शुक्रवारी रोजी सकाळपासून घरातून निघून गेले होते. रात्रीही ते घरी परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. शनिवारी सकाळी 11 वाजता त्यांचा मृतदेह गारखेडा शिवारातील जालना रस्त्यालगत असलेल्या बाजीराव साबळे यांच्या विहिरीमध्ये सापडला.

साबळे यांनी शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असे सांगण्यात आले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तात्काळ पंचनामे करण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पाठविले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साबळे यांना 11 वर्षांचा मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, दोन बहिणी आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या