
सामना ऑनलाईन, मुंबई
पंढरपूर येथील बाभूळगावचा शेतकरी दत्तू माळी याने आज विधिमंडळासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतात विजेसाठी अर्ज करूनही कृषिपंपाला आवश्यक वीज मिळत नाही म्हणून हा शेतकरी विधिमंडळासमोर आत्मदहनाच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दत्तू माळी या 55 वर्षीय शेतकऱ्याने 2009 पासून कृषिपंपाला वीज मिळावी म्हणून अर्ज केला मात्र योग्य दाबाने वीज मिळत नसल्याने शेताला पाणी देण्यात वारंवार अडचणी येत आहेत. यासंदर्भात योग्य क्षमतेचे वीज कनेक्शन मिळावे म्हणून त्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यानंतरही त्याला हे कनेक्शन मिळाले नाही. ऊर्जामंत्र्यांपासून सर्व विभागांत पाठपुरावा करूनही त्याची मागणी पूर्ण झाली नाही. अखेर आज सकाळी विधिमंडळाच्या आयनॉक्स सिनेमासमोरील गेटजवळ येऊन त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सावधगिरी दाखवून तो अंगावर रॉकेल ओतण्याआधीच त्याला ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनर्थ टळला.





























































