कर्जबाजारी शेतकऱ्याच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

अतिवृष्टी आणि लहरी निसर्गाचा फटका बसलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या पत्नीने नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माढामध्ये घडली आहे. राजश्री अशोक शेळके (रा. मानेगाव, ता.माढा) असे शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव आहे. त्यांनी कर्जबाजारीपणा व द्राक्षबागेला फळ आले नसल्याने नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात बार्शी पोलिसात नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीच्या आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच ही घटना घडली आहे.

मानेगाव येथे अशोक शेळके यांची दोन एकर द्राक्षाची बाग आहे. मात्र, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या द्राक्षबागेला द्राक्षच लागले नाहीत. त्यातच द्राक्ष बागेसाठी केलेला मोठ्या प्रमाणावरील खर्च ,फवारणीसाठी खर्च केलेले लाखो रुपये, मजुरी हा सर्व खर्चासाठी त्यांच्यावर आठ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

यातच काही खाजगी सावकार व बँकेचे कर्ज त्यांच्यावर होते. बँकवाले व खाजगी सावकार त्यांच्यामागे पैशांसाठी सतत तगादा लावत होते. यावर्षी द्राक्षबाग पूर्णपणे वाया गेल्यामुळे या लोकांचं देणे कसे द्यायचे, या विचारात त्यांच्या पत्नी राजश्री शेळके सोमवारी सकाळी द्राक्ष बागेत गेल्या.

द्राक्षबागेला एकही द्राक्षाचा घड आलेला नाही . लोकांचे पैसे, बँकेचे कर्ज हे कसे फेडायचे याच तणावाखाली त्यांनी द्राक्षांवर फवारायचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना बेशुद्ध पडल्याचे समजल्यावर त्यांना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

माढा तालुक्यातील पूर्व भागात द्राक्ष बागांचे प्रमाण जास्त आहे. यंदा तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवर वारंवार फवारण्या कराव्या लागल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. हा लाखो रुपयांचा खर्च कसा भरून निघणार या विवंचनेत शेतकरी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या