रेणापूर येथे सरणावर बसून आंदोलन

44

सामना प्रतिनिधी । लातूर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी किसान सभेने १ जून ते १० जून २०१८ दरम्यान राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त पाठिंबा दिला आहे. रेणापूर येथील पिंपळ फाटा येथे शेतकऱ्यांनी सरणावर बसून आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व गजानन बोळंगे यांनी केले. बोळंगे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ऊसाला २१०० रु भाव द्यावा, पीक विमा द्यावा तसेच किसान सभेने केलेल्या सर्वच मागण्या मान्य कराव्यात असे शेतकऱयांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीही संप केला होता. त्यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांचा समावेश होता.

खलग्री गावातील शेतकरी एकत्र आले आणि पिंपळफाटा येथे सरण रचून त्यावर बसून आंदोलन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या