
ऑगस्ट महिना अखेर असताना बीड जिल्ह्यात पाऊस मात्र नाही. तीन महिन्याचा कालखंड कोरडा गेला, थोड्याश्या पावसावर लागवड झाली. कापूस उगवला, मात्र पाऊसच नसल्याने उभे पीक वाळू लागले. पुन्हा पाऊस पडेल आणि दुबार पेरणी करू या अपेक्षेने बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 25 गावामधील शेतकऱ्याने कापसासह खरीप पिकामध्ये औत घालून आपल्या हाताने पीक मोडून टाकले.
बीड जिल्ह्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले. शेतकरी हताश झाला आहे, दुष्काळाचा दशावतार पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऑगस्ट महिना मावळतीकडे झुकला, मात्र पाऊस आला नसल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे. थोड्याश्या पावसावर कापूस आणि खरीप लागवड केली. मात्र, पुन्हा पाऊसच झाला नसल्याने पिकाचे रोपटे सुकू लागले. वाढ खुंटली बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी, कवडगाव, साळीबा, मामला, मोरेवाडी, खळवट लिमगाव, पिपरखेड, चिंचोटी, बाहेगव्हान, हिव्हरगव्हान, काडीवडगाव, चिचाला, पिप्री, देवडी येथील हजारो शेतकऱ्याने कापसाच्या उभ्या पिकात औत घालून कापसाचे पीक आपल्या हाताने उद्ध्वस्त केले.
कापसासह, सोयाबीन, मटकी ,मूग ,उडीद या पिकांवरही नांगर फिरवावा लागला. तब्बल 2 हजार हेक्टरवरील खरीप पीक आतापर्यंत उद्ध्वस्त केले आहेत. कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पंचनामे केले गेले आणि हे पीक हातातून गेले असल्याचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जड अंतःकरणाने शेतकऱ्यांनी पिके मोडून टाकली आहेत.



























































