
सामना ऑनलाईन, धुळे
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांदा विक्रीवर अनुदान जाहीर करून दिलासा दिला आहे. मात्र आपला कांदा विक्री करताना शेतकऱ्यांनी ज्या नावे विक्री केली आहे त्याच नावावर हे अनुदान जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अर्ज करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. यामुळे अनुदानासाठी प्रतिज्ञापत्र मिळवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
जिह्यातील बहुसंख्य शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. पण गेल्या दोन महिन्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. उत्पादन खर्चापेक्षादेखील कमी रक्कम कांद्याला मिळाली म्हणून शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. काही शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा फेकून दिला. काहींनी शेतात कांदा टाकून त्यावर ट्रॅक्टर फिरविले. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने सानुग्रह अनुदान पाचऐवजी दहा टक्के देण्याचे जाहीर केले. त्यानुसार आता 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे अशा शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे. त्यासाठी बाजार समितीतील लिपिक सुरेश काळे आणि मोहन थोरात यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत.
15 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करा!
अर्ज भरून देताना शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड असलेल्या सातबाराचा उतारा, बँक पासबुकचे पहिले पान, रेशनकार्ड, आधारकार्डची झेरॉक्स तसेच कांदा विक्रीच्या हिशेबाची पावती जोडणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांनी कागदोपत्री असलेल्या नावाऐवजी टोपण नावाने कांदा विक्री केला असेल तर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रदेखील द्यावयाचे आहे. अर्ज दाखल केल्याशिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव सानुग्रह अनुदान मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी 15 जानेवारीपर्यंत अर्ज द्यावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.





























































