मराठवाड्याचे पार वाटोळे झाले! खायला अन्न नाही, हाताला काम नाही; पोट कसे भरायचे, शेतकर्‍यांपुढे प्रश्न

>> महेश कुलकर्णी

रानोमाळ येणारा पिकांचा सडका, कुबट वास, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली दलदल, खरडून गेलेल्या जमिनी, त्यावर पडलेली विवरे, शिवारात बेवारस पडलेल्या मृत पशुधनाचे लचके तोडण्यासाठी घिरट्या घालणारे पक्ष्यांचे थवे… हे आहे मराठवाड्याचे विदारक चित्र! निसर्गाने मराठवाड्याचे पार वाटोळे केले. खायला अन्न नाही आणि हाताला काम नाही… लेकी उजवायच्या कशा, कर्ज फेडायचे कसे आणि पोट भरायचे कसे या प्रश्नांनी जर्जर झालेल्या शेतकर्‍याच्या डोळ्यातून येणारा महापूर पाहण्यासाठी सुरू झालेले पूरपर्यटन मात्र सध्या जोरात सुरू आहे!

छत्रपती संभाजीनगरपासून ते नांदेडपर्यंत आणि बीडपासून लातूरपर्यंत सगळा मराठवाडा महापुराच्या तडाख्यात सापडला. जायकवाडी, मांजरा, तेरणा, विष्णुपुरी, येलदरी, सिद्धेश्वर, शिवना, निम्न दुधना झाडून सार्‍या धरणांचे दरवाजे सताड उघडे ठेवण्याची वेळ अजस्त्र पावसाने आणली. मांजरा, तेरणा, सिना कोळेगाव ही धरणे मुळातच दुष्काळी भागात उगम पावणार्‍या नद्यांवर बांधलेली. ही धरणे निम्मी भरली तरी शेतकरी खुश. यंदाच्या पावसाळ्यात ही धरणे मे महिन्यापासून तुडुंब भरलेली. त्यामुळे सतत पडणार्‍या पावसाचे पाणी वाहून नेण्याशिवाय नद्यांना पर्यायच उरला नाही.

नद्यांचे नाले कुणी केले?

मराठवाड्यातून वाहणार्‍या गोदावरी, मांजरा, तेरणा, सिंदफणा, पूर्णा, दुधना आदी मोठ्या नद्या, त्यासोबतच या नद्यांच्या उपनद्यांची नैसर्गिक पात्र रचनाच बदलून गेली आहे. नदीकाठ कोरून आत घुसलेली शेते, वाळूचा उपसा करण्यासाठी नद्यांची झालेली उरफोडी आणि पात्रांमध्ये होत असलेली अतिक्रमणे याचा कधीही विचार झाला नाही. त्यामुळे अतिवृष्टीचा ताण सहन करण्याची क्षमताच या नद्यांमध्ये उरली नाही. परिणामी पात्र फुगत गेले आणि तटलेल्या पाण्याने वाट फुटेल तिकडे धाव घेतली. बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमधील पुराची ही कथा. नद्या वाळूची निर्मिती स्वत:साठी करतात. पाण्याबरोबर नदी वाळू काठावर टाकून पुढे प्रवाहित होते. मराठवाड्यातील एकही नदी अशी नाही की वाळूसाठी जिच्या नरडीला जेसीबी लागलेला नाही. मराठवाड्यातील नद्यांनी आता वाळूची निर्मितीच करणे बंद केले आहे. पुराची तीव्रता वाढण्याचे हे महत्त्वाचे कारण. परंतु त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.

हवामान बदलाचा अभ्यास करणार कधी?

मराठवाडा हा पर्जन्यछायेतला प्रदेश. कधी बेसुमार पाऊस तर दोन दोन वर्षे आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ. पण या दशकात मराठवाड्यातील पर्जन्यमानात प्रचंड बदल झाला आहे. यंदा तर मे महिन्यात अतिवृष्टी नोंदवली गेली. यावर्षीच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा पाऊस झाला तेव्हा अतिवृष्टीचीच नोंद झाली. मराठवाड्याचा भूगर्भ खडकाळ आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे. मे, जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसाने भूजल पातळी वाढली. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस जमिनीत न मुरता भूपृष्ठावरच राहिला. त्यामुळे शेतशिवारामध्ये चार चार फूट पाणी साचले. मराठवाड्याच्या हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे काहीही झाले नाही.

एनजीओचे दुष्काळी पीक कुठे गेले?

मराठवाड्याला दुष्काळ नवीन नाही. मागच्या दहा वर्षांत मराठवाड्याने ओला, सुका असे दुष्काळ पाहिले. या दुष्काळात कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे उगवलेल्या स्वयंसेवी संस्था पाहिल्या. आज मराठवाडा महापुरात बुडत असताना या संस्था कुठे आहेत? लातूरला पाणी पाजण्यासाठी थेट आंध्र, तामिळनाडूूतून पाण्याची पाकिटे येत होती. दिवाळीचा फराळ तर टाकून देण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आली, गाड्यांची रांगच लागली होती. रस्त्या रस्त्यावर जनावरांच्या छावण्या उभ्या राहिल्या. त्यात भ्रष्टाचाराची कुरणे माजली. किती जनावरे जगली, किती मेली याची कोणतीही मोजदाद नाही. नेत्यांवर अविश्वास म्हणून लोकांनी अभिनेत्यांवर विश्वास टाकला. त्यांचेही ‘नामोनिशाण’ कुठे दिसत नाही. ‘माथा ते पायथा’ हा जलसिंचनाचा गाभाच जलयुक्त शिवारसाठी गाडून टाकण्यात आला. मराठवाड्यात जर जलयुक्त शिवारची विक्रमी कामे झाली होती तर शेतांचे जलाशय कसे झाले? जलयुक्तची सर्वाधिक कामे बीड जिल्ह्यात झाली पण महापुराचा तडाखा याच जिल्ह्याला जास्त बसला आहे.

आताही मुळ प्रश्न बाजूला ठेवून मदतीचे सोहळे होतील

मराठवाड्यातील शेतकरी स्वाभिमानी आहे. त्याला गरज आहे ती उभारी देण्याची. मुळात शेतकर्‍यांसाठी काही करायचे असेल तर त्याचा अभ्यास करायला हवा. मराठवाड्यातील शेती, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न याचे आकलन करण्याचा कुणी प्रयत्न केला का? दुर्दैवाने त्याचे उत्तर नाही असेच मिळते. आताही मूळ प्रश्न बाजूला ठेवून मदत देण्याचे सोहळे रंगतील. पण त्यातून शेतकर्‍यांना खरा आधार मिळणार आहे का? शेतकर्‍याला आधार द्यायचा असेल, या संकटातून त्याला बाहेर काढायचे असेल तर गरज आहे ती वर्षानुवर्षे चालत आलेले कृषी धोरण बदलण्याची. ही धमक सरकार दाखवणार आहे का?

मराठवाड्याचे झालेले नुकसान

केवळ सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जवळपास सगळेच रस्ते खराब झाले आहेत. अनेक ठिकाणचे पूल, बंधारे, पाझर तलाव फुटले. शिवारात वस्ती करून राहणारे संसार उघड्यावर आले. घरांची पडझड अपरिमित आहे. पशुधन वाहून गेले. जमिनी खरवडल्या. शेतांचे जलाशय झाल्याने जमिनी चिभडल्या. फळबागा वाहून गेल्या. खरिपाचा एक दाणाही शिवारात शिल्लक राहिला नाही.