कोकणातील शेतकऱ्यांनो आंबा-काजू नको; बांबू-साग लावा; पेम संस्थेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या हवामानामुळे कोकणात आंबा व काजूच्या उत्पादनाचा भरवसा राहिलेला नाही. हवामान बदल आणि किडींच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे त्रस्त झालेले शेतकरी या फळझाडांवर फवारण्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च करतात. या व्यतिरिक्त बाग साफ करण्यापासून तयार झालेला आंबा बाजारात पाठवण्यापर्यंत विविध टप्प्यांवरही बराच खर्च करावा लागतो आणि इतकं करूनही पदरात काय पडेल, याची शाश्वती नसते. एखाद्या दिवसाचं मळभ किंवा पाऊस सगळं गणित पार बिघडवून टाकतो. ही परिस्थिती लक्षात लक्षात घेता, आंबा-काजूच्या फळबागांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यापेक्षा, फार कष्ट न घेता आणि खर्चाचाही फारसा भार न होता हमखास पैसा मिळवून देणाऱ्या बांबू आणि सागाची शास्त्रशुद्ध पद्धतीने वनशेती करावी असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील ‘ पेम ‘ या संस्थेने केले आहे .

सागवान आणि बांबू यांना ना बदलत्या हवामानाचा धोका, ना कीड-रोगाचा फटका. शिवाय, बांबू लागवडीसाठी शासकीय अनुदानही आहे. यामध्ये बांधावर आणि शेतात लागवड, हे दोन्ही प्रकार मान्य केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सुरुवातीचा खर्च बराच कमी होणार आहे. भातशेती सोडलेल्यांसाठी किंवा नापिक जमिनींसाठी ही उत्तम योजना आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून सागाची रोपं वाजवी दरात मिळतात.

गाव पातळीवर मोहीम घेऊन कृषी खात्याकडे बांबूच्या रोपांची चांगल्या संख्येने मागणी केली तर, बांबू मिशनतर्फे टिश्यू कल्चरचीही रोपं मिळू शकतील. या दोन्ही झाडांच्या लागवडीचं दर वर्षी टप्प्याटप्प्याने नियोजन केल्यास सुमारे पाच वर्षांच्या काळानंतर दरवर्षी हमखास उत्पन्न मिळू शकतं. कारण बांबू सुमारे पाच वर्षांनंतर, तर सागाचं झाड सुमारे १३ ते १५ वर्षानंतर तोडीला योग्य असतं. शिवाय, एकदा लागवड केल्यानंतर बांबुची बेटं आणि सागाचे फुटवे वारंवार उत्पन्न देत राहतात. उन्हाळ्यात पाणी देण्याची सोय असेल तर आणखी लाभदायी ठरते. त्या दृष्टीने जणू ही शेतकऱ्यांसाठी एटीएम योजना आहे असे मत लोक सक्षमीकरण चळवळ अर्थात पेमचे सतीश कामत यांनी व्यक्त केले आहे.