
आज बुधवारी दुसऱया दिवशीही पोलिसांनी ड्रोन्स उडवले तर शेतकऱयांनीही पतंगी उडवून ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या दिशेकडील महामार्गावर शेकडो ट्रक्टर उभे करण्यात आले आहेत. आजही शेतकऱयांनी बॅरीकेड्स आणि सिमेंटचे ब्लॉक्स ट्रक्टरने सरकवण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याने हरयाणा पोलिसांनी ड्रोनमधील अश्रुधुराच्या नळकांडय़ा आणि रबरी गोळ्यांचा वर्षाव केला. मंगळवारीही हीच परिस्थिती होती. ड्रोनला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱयांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस उपअधीक्षकासह तब्बल 24 पोलीस जखमी झाले, तर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात आंदोलकांचीही डोकी फुटली.
पुढचे दोन दिवस हरयाणा सरकारने अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या सात जिह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तसेच पंजाब सरकारने शंभू आणि खनौरी सीमेवरील रुग्णालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवला आहे.
आज बैठक
केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची शेतकरी नेत्यांसोबत विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात येणार आहे.
मोदी एमएसपीच्या गॅरंटीपासून का पळताहेत?- काँग्रेस
मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱयांचा विश्वास त्यांनी गमावला आहे. मोदी किमान आधारभूत कायद्याच्या गॅरंटीपासून का पळताहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. तर मोदी सरकार हे शेतकऱयांप्रति हुकूमशहासारखे वागत असल्याची तोफ काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आंदोलकांशी बोलताना डागली.
शेतकऱयांना गुन्हेगारांसारखे वागवू नका
आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी वाटेल ते केले जात आहे. बॅरीकेड्स, खिळे ठोकले जात आहेत. वर्तमानपत्रांतून बातम्या येत आहेत, त्यांच्यासाठी तुरुंगही तयार केला जात आहे. हे अत्यंत भयानक असून ते शेतकरी आहेत गुन्हेगार नाहीत, अशा शब्दांत भारतरत्न एम.एस. स्वामिनाथन यांची मुलगी कृषी अभ्यासक, तज्ञ मधुरा स्वामिनाथन यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. माझी सर्व वैज्ञानिकांना विनंती आहे की, अन्नदात्यांशी बोला चर्चा करा, त्यांचे प्रश्न सुटतील. त्यासाठी प्रयत्न करा, असेही त्या म्हणाल्या. एम.एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात मधुरा स्वामिनाथन व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होत्या.

























































