
सामना प्रतिनिधी । सेलू
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची जय्यत तयारी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असून 16 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार विजय भांबळे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करुन आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, वसंतराव बोराडे आदी उपस्थित होते.
22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन 22 तारखेला सकाळी 10 वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड असणार आहेत. शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर 2 लाख स्केअर फूटांचा मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून संपूर्ण मंडप हा वॉटरप्रुफ करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या खबरदारी घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर पार्किंगची व्यवस्था नूतन महाविद्यालयाच्या समोरील बसस्टॉपच्या मागील मैदानावर करण्यात आली आहे. सेलूसह 10 तालुक्यातील एक हजार गावांमध्ये प्रचाराचा ताफा धडकणार असून 2 लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष वसंत बोराडे, रामराव बोबडे, रामराव गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत. या कृषी प्रदर्शनात 22 व 23 फेब्रुवारी रोजी पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक जातीनिहाय क्रंमाक काढून रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी 9130 32 6677 व 8805 686008 या क्रंमाकावर नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.




























































