
कांद्याची दरवाढ व अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली असून, दर मात्र कमालीचे कोसळले आहेत. यातून उत्पादन व वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिह्यासह मराठवाडा व कर्नाटकातील शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याची आवक वाढल्याने दर प्रतिक्विंटल 200 ते 800पर्यंत खाली आले आहेत. उत्पादन खर्च 2000च्या पुढे असताना शेतकऱयांच्या कांद्याला योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकऱयांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढत लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱयांच्या घोषणाबाजीने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱयांचे आंदोलन काही काळ थांबविले.
शेतकऱयांच्या वतीने कांद्याला प्रतिक्विंटल 3000 रुपये हमीभाव जाहीर करावा, पीकविमा तत्काळ द्यावा, राज्यातील बाजार समितीमध्ये शेतकरी निवास सुरू करावे, हमीभाव आणि नुकसानीपोटी प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान तत्काळ द्यावे, अशी मागणी करत निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड, शरद भालेकर, राम हाके, रामराव काटे, आबासाहेब नलगे, दत्तात्रय ठोंबरे, अप्पासाहेब मोरे यांच्यासह जिह्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.



























































