कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

दुष्काळी परिस्थितीतील नापीक शेती अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल (ता.२६) रात्री घडली. बाळासाहेब मच्छीद्र खुरूद (वय ४३, रा. महांकळवाडगांव, ता. श्रीरामपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित व अविवाहित अशा दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

बाळासाहेब खुरूद दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीशी सामना करत होते. यांच्या शेतात जेमतेम कुटूंबखर्च चालेल अशीही शेती पिकली नाही. त्यांच्या व पत्नीच्या नावांवर सेवा संस्थेचे कर्ज आहे. त्यातच खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. त्यातूनच खुरूद यांनी काल रात्री शेतातील आपल्या राहत्या घराजवळ विष प्राशन केले. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर गावातील कार्यकर्ते अन् नातेवाईकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे आणण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने येथील रूग्णालयांनी दाखल करून न घेतल्याने त्यांना लोणी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर आज दुपारी महांकळवाडगांव येथे गोदावरी नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या आई स्व. ताराबाई मच्छींद्र खुरूद या २००१ ते.२००६ या कालावधीत सरपंच होत्या. त्यावेळी बाळासाहेब हेच सरपंच पदाचा कार्यभार पाहत असे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.