
कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन देणारी निर्धाक शेती कशी करावी याविषयी पोहनकर फाऊंडेशनद्वारे संशोधन केले जाते. शेतकऱयांसाठी हे तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. कर्जबाजारीपण, आत्महत्या या समस्यांतून शेतकऱयांना मुक्त करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होत असल्याचे आता दिसून येऊ लागले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पोहनकर यांचा या प्रयोगाचा वेध घेणारा हा लेख.
आजपासून 33 वर्षांपूर्वी, 1985 सालचा ऑगस्ट महिना. एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातील कृषी अधिकारी या नात्याने मी विदर्भातील शेतकऱयांना भेटत होतो. यवतमाळ जिह्यातील एका दुकानात कोपऱयात बसून कीटकनाशकांची खरेदी करायला आलेल्या शेतकऱयांचे बोलणे मी ऐकत असतानाच एक शेतकरी आला आणि त्याने दुकानदाराकडे एका कीटकनाशकाची मागणी केली. दुकानदाराने कोणतीही चौकशी न करता त्याला एक लिटरची बाटली दिली. तो शेतकरी ते कीटकनाशक नक्की कशासाठी फवारणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी दुकानाबाहेर पडलो आणि आपल्या गावाकडे निघालेल्या त्या शेतकऱयाला भेटलो. तो म्हणाला, माझ्या पिकावर कीड नाही. हे कीटकनाशक मी कपाशीचं पीक हिरवंगार करण्यासाठी फवारणार आहे. त्याचा त्या कीटकनाशकावर इतका प्रचंड विश्वास होता की त्याचा गैरसमज दूर करण्याच्या फंदात मी पडलो नाही. त्या काळी मी नेहमी काही पुडय़ा खिशात बाळगत असे. मी त्या शेतकऱयाला एक पुडी दिली, तिच्यातील पावडर 15 लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला दिला आणि एक आठवडय़ानंतर पुन्हा त्याच दुकानात भेटण्याचं आश्वासन देऊन त्याचा निरोप घेतला.
एक आठवडय़ानंतर त्या कृषी सेवा केंद्रात तो शेतकरी माझी वाटच बघत बसलेला होता. मी दिलेली भुकटी फवारून त्याची कपाशी चारच दिवसांत हिरवीकंच झाली होती आणि कीटकनाशकाची बाटली त्याने दुकानदाराला परत केली होती. या भुकटीची किंमत अगदी अत्यल्प आहे हे त्या शेतकऱयाला पटवून द्याावं लागले. एखाद्या शेतकऱयाने गैरसमजामुळे खर्च केलेले शंभर रुपये मी केवळ पाच पैशात वाचवू शकतो तर पिकांचा उत्पादनखर्च मोठय़ा प्रमाणात का कमी करू शकणार नाही? या प्रश्नाने मला अस्वस्थ केले आणि त्याच क्षणी माझ्या मनात जन्म झाला शेतीचे व शेतकऱयांचे आयुष्य बदलून टाकणाऱया एका जगावेगळ्या तंत्राचा!
शेतकऱयांना कृषिविज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी 20 वर्षांपूर्वी वयाच्या 44व्या वर्षी मी नोकरीचा राजीनामा देऊन ‘पोहनकर फाऊंडेशन’ ही धर्मादाय संस्था सुरू केली. कोणाकडूनही देणगी स्वीकारायची नाही व कोणालाही देणगी द्यायची नाही. शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी आयोजित केल्या जाणाऱया कोणत्याही कार्यक्रमासाठी एक रुपयाही मानधन स्वीकारायचे नाही या दोन महत्त्वाच्या तत्त्वांवर ‘पोहनकर फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात होणारे शोषण थांबवण्यासाठी त्यांना कृषी क्षेत्रातील मूलभूत गोष्टींबद्दल माहिती देऊन त्यांचे गैरसमज, अंधश्रध्दा दूर करणे आवश्यक होते. माती, पाणी, बियाणे, खते, मशागत, पीक संरक्षण, पिकांचे मूल्यवर्धन अशा अनेक विषयांवर शेतकऱयांशी चर्चांना सुरूवात झाली. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, मिठावरील शेती, झिरो बजेट शेती अशा विविध शेती तंत्रांबाबत कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यावेळी हरितक्रांती ऐन जोमात होती. रासायनिक खते, सूक्ष्मद्रव्ये, संकरित बियाणे, जहाल कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा शेतकऱयांवर पाऊस पाडण्यासाठी सरकारी व खाजगी कंपन्या अहमहमिकेने स्पर्धेत उतरल्या होत्या.

शेतकऱयांनी स्वत:च्या शेतीत जगावेगळे प्रयोग करून त्यांचा परिणाम बघितल्याशिवाय एकाही शेतकऱयाचा त्या प्रयोगांवर विश्वास बसणार नाही हे लक्षात आल्यामुळे कार्यशाळा थेट शिवारात नेण्यास सुरूवात झाली. रासायनिक खतांचे जमिनीवर व कीटकनाशकांचे शेतकऱयांवर होणारे भयानक परिणाम अनेक वर्षे मी अत्यंत जवळून बघितले होते. कीटकांचा नायनाट करण्यासाठी अगदी सहज उपलब्ध असलेल्या व कोणत्याही शेतकऱयाला परवडेल अशा पदार्थाचा प्रयोग करायचा, जो करण्यासाठी कोणतीही काळजी घेण्याची गरजच भासणार नाही असा पदार्थ मला अनेक वर्षांपासून माहीत असल्यामुळे पोहनकर फाऊंडेशनने समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेल्या खडे मिठाच्या प्रयोगांची सुरवात करून पहिला हल्ला चढवला तो रासायनिक खते व कीटकनाशकांवर!
कंपन्यांनी तयार केलेल्या डबे, बाटल्या व पोत्यांमधील वस्तू शेतीत वापरण्याची शेतकऱयांना इतकी सवय झाली होती की मिठासारखी सहज उपलब्ध होणारी, अत्यंत स्वस्त व उपयुक्त वस्तू वापरण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. शेतीत मीठ वापरणे हा गुन्हा आहे आणि मीठ वापरले तर जमीन क्षारपड होते असा शेतकऱयांचा गैरसमज असतो. तसेच या गैरसमजाला पृषी अधिकारी व कंपन्या हेतुपुरस्सर खतपाणी घालत असल्यामुळे मीठ वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं ही सोपी गोष्ट नव्हती. शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळणारे भाव; खते, बियाणे, कीटकनाशके व तणनाशकांसारख्या पृषिनिविष्ठांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या किमती; दुष्काळाचा तडाखा; पाण्याची टंचाई; कर्जबाजारीपणा यासारख्या अस्मानी व सुलतानी आपत्तींनी गांजलेल्या शेतकऱयांच्या आत्महत्या या अतिशय चिंताजनकरीत्या वाढू लागल्या. शेतकऱयांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सक्षम व खात्रीचा पर्याय शोधण्यास सुरवात केली. या परिस्थितीतूनच एक नवा पर्याय जन्माला आला ज्याचं नाव आहे ‘स्वयंसिध्द शेती तंत्र’.
शेतीतील मिठाच्या प्रयोगांचा माझा अनेक वर्षांचा अनुभव व शेतकऱयांच्या प्रत्यक्ष अनुभवांचा अंतर्भाव पोहनकर फाऊंडेशनतर्फे सादर केल्या जाणाऱया ‘स्वयंसिध्द शेती तंत्र’ या कार्यशाळेत करण्यात आला आणि चारही दिशांनी परिस्थितीचा असह्य मार झेलणाऱया शेतकऱयांची मिठाच्या प्रयोगांबद्दल उत्सुकता वाढू लागली. ही कार्यशाळा शेतीतील अगदी सोप्या व अत्यंत कमी खर्चाच्या अनेक प्रयोगांवर आधारित असल्यामुळे शेतकऱयांनी प्रयोग करण्यास सुरवात केली.
‘स्वयंसिध्द शेती तंत्र’ म्हणजे केवळ खडे मीठ व गार्बेज एन्झाईमचे प्रयोग असा अनेक शेतकऱयांचा गैरसमज आहे. पण या तंत्रात सायकल व मोटरसायकलीच्या मदतीने सिंचन, बाजारात आठ लाखांत मिळणारे ट्रक्टर केवळ पंचवीस हजारांत तयार करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, पाखरांना पळविण्याचे उपाय, शेवग्याच्या बियांपासून जगातील सर्वात शुध्द पाण्याची निर्मिती यासारखे असंख्य प्रयोग आहेत. हे अत्यंत सोपे व कमी खर्चाचे प्रयोग शेतकऱयांना करता यावेत यासाठी ‘स्वयंसिध्द शेतकरी’ व ‘मिठातून समृध्दीकडे’ या पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आली आहेत व ती घरपोच उपलब्ध करून दिली जातात.
सध्या सर्वत्र गुलाबी बोंडअळीने थैमान घातलेले असताना अनेक शेतकऱयांच्या कपाशीच्या पिकात एकही अळी सापडली नाही कारण त्यांनी या पुस्तकांचे बारकाईने वाचन केले व जमीन तयार करण्यापासून कापसाची वेचणी करण्यापर्यंत या तंत्राचा वापर करून केवळ उत्पादनच वाढवले नाही तर तब्बल नक्वद टक्के खर्चही कमी केला आहे. शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी पोहनकर फाऊंडेशनची 9822698100 ही हेल्पलाईन सकाळी 6 ते रात्री 8 या वेळात उपलब्ध असते. आज ‘स्वयंसिध्द शेती तंत्राचे’ प्रयोग हिमाचल प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत अनेक राज्यातील लाखो शेतकरी विविध पिकांमध्ये करून उत्पादन खर्चात मोठय़ा प्रमाणात कपात करत आहेत. हे तंत्र सर्वदूर उपयोगात आणले जाऊ लागल्यास कर्जबाजारीपणा व आत्महत्या या समस्या कमी होऊन शेती व शेतकऱयांना समृध्दीचे दिवस येतील.

























































