Black Beauty !

551

>> लीना टिपणीस, फ़ॅशन डिझायनर

आज मकर संक्रांती. काळ्या रंगाचा मानाचा सोहळा. आपल्या दृष्टीने काळा रंग जरी संक्रांतीपुरता मर्यादित असला तरी फॅशन जगतात काळा रंग म्हणजे रुबाबदार… देखणा… आजचा Fashion Diva

काळा रंग आपल्याकडे अशुभ मानला जातो. त्यामुळे शुभकार्याला काळा रंग वापरणे शक्यतो टाळले जाते. पण गेल्या काही वर्षांत काळ्या रंगाची जादू इतकी पसरली आहे की सध्या याच रंगाची चलती आहे. कपड्यांपासून मेकअपपर्यंत आता काळा रंग फॅशनमध्ये सर्रास हिट आहे. काळाप्रमाणे लोकांची मानसिकता बदलली आहे. काळ्या रंगाचे कपडे आज आवर्जून घातले जात आहेत. सामान्यांपेक्षा वेगळे करण्याकडे तरुणांचा कल असतो. या रंगामुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचे सामर्थ्य काळ्या रंगात आहे. हा रंग उठावदार असल्यामुळे तो सगळ्यांमध्ये उठून दिसतो. जर्मनीचे डिझायययनर कार्ल लॅगरफेल्ड नेहमी काळ्या रंगाचा गॉगल, काळी ट्राऊजर आणि पांढरा शर्ट घालायचे. ते काळा रंग ताकदीचा प्रतिक असल्याचे मानायचे. त्यामुळे त्यांच्या कपड्यांवर या रंगाचा प्रभाव दिसायचा.  

ब्लॅक रेवन हेअर कलर

केसांना वेगवेगळे रंग वापरायचा जमाना गेला. आताच्या ट्रेण्डमध्ये तरुणींना भुरळ पडलीय ती काळ्याभोर केसांची. केस जास्त काळे दिसण्यासाठी ‘ब्लॅक रेवन हेअर कलर’ची फॅशन सध्या गाजतेय. त्यामुळे हा रंग वापरून पाहायला हरकत नाही.

काळ्या रंगाचा परिधान

काळा रंग म्हणजे गडद रंग. आत्मविश्वासाचं प्रतीक. त्यामुळे फॉर्मल कपड्यांमध्ये तो प्रामुख्याने वापरला जातो. नेतृत्वगुण, खंबीरपणा या रंगांमध्ये अधोरेखित होतो. मस्त स्लीम दिसायचं असेल किंवा शरीरयष्टी फोकसमध्ये आणायची असेल, तर काळा रंग कधीही चांगला. पार्टी किंवा कार्यक्रमात गडद काळ्या रंगाचे कपडे चटकन नजरेत भरतात. या कपड्यांमध्ये उंचीही जास्त दिसते. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी या रंगाचे कपडे परिधान करता येतात. त्याला वेळेचं बंधन नाही. एखाद दिवशी काय घालावं हे सुचत नसेल, तर काळ्या रंगाचा ड्रेस सहज घालता येतो. त्यामुळे काळ्या कपड्याच्या चाहत्यांची मोठी यादी आहे. यासाठी फेसबुकवर ‘ब्लॅक कलर फॅन क्लब’ही आहे. या चाहत्यांना काळ्या कपड्यांशिवाय इतर कोणताही रंग आवडत नाही. रात्री गडद रंग फोकसमध्ये ठेवू शकता. एखाद्या पार्टीमध्ये गडद रंगसंगतीसोबत सोनेरी किंवा चंदेरी छटाही वापरल्या जातात.

काळे नेलपेण्ट

नखांवर वेगवेगळे ऑफबीट रंग लावणे सगळ्यांनाच आवडते. त्यात काळा रंगही कुठे मागे नाही. आज नेलआर्टमध्ये काळा रंग हमखास दिसून येतो.  काळ्या कपड्यांवर काळ्या रंगाची नेलपेण्ट शोभून दिसते. ही नेलपेण्ट  आकर्षक वाटते आणि  लोकांचे लक्ष वेधून घेते. कॉलेज तरुणींचा या नेलपेण्टकडे जास्त कल असतो.

 

थोडी हटके लिपस्टिक

काळा रंग आतापर्यंत ओठांवर कुणी लावला नसेल आणि तसा प्रयत्नही केला नसेल पण काळ्या रंगाची लिपस्टिकची शेड फॅशनमध्ये येऊ लागली आहे.  ज्यांना काहीतरी इतरांपेक्षा हटके करायचे असेल आणि चर्चेत राहायचे असेल तर काळ्या रंगाची लिपस्टिक लावायला काहीच हरकत नाही. हा रंग वापरणे थोडे धाडसाचेच आहे. कारण काहींना हा रंग लावलेला आवडणारही नाही. पण अशाप्रकारचे ऑफबीट रंग लावल्यावर बिनधास्त वावरले पाहिजे. हा रंग लावल्यावर कपड्यांचे शेड्स लाईट असलेले चांगले.

 

डोळ्यांसाठी काळ्या रंगाचा मेकअप

काळ्या रंगाचा मस्करा हा सर्व प्रकारच्या त्वचेच्या पोताला चांगला दिसतो. त्यामुळे डोळे खूपच उठावदार दिसतात. मस्कारा लावून झाल्यावर ब्रशने पापण्यांचे केस विलग करावेत. हल्ली सगळ्यांना प्रत्यक्ष जसे दिसतो त्यात इंटरेस्ट नसतो त्याच्यापेक्षा वेगळं काही करण्यात इंटरेस्ट असतो. त्यात आता भर पडलीय ती स्मोकी आईज लूकची. हा लूक अजूनही ट्रेण्डी आहे. स्मोकी लुक दिसण्यासाठी काळ्या रंगाची आयशॅडो डोळ्यावर लावली जाते. यासाठी कुठल्याही वेस्टर्न कपड्यांवर काळा आयशॅडो छान दिसतो.

आपली प्रतिक्रिया द्या